मेहरूण स्मशानभूमीजवळील नालेसफाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:20+5:302021-05-27T04:18:20+5:30
जळगाव : येथील प्रभाग समिती ३ मधील मेहरुण स्मशानभूमीजवळील नाला सफाईसह, नाल्याचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात ...
जळगाव : येथील प्रभाग समिती ३ मधील मेहरुण स्मशानभूमीजवळील नाला सफाईसह, नाल्याचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह नगरसेवक सदाशिव ढेकळे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, रियाज बागवान, मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांना पावसाळ्यापूर्वी नियोजन करून तातडीने स्वच्छता करण्याचे आदेशही महापौर व उपमहापौरांतर्फे देण्यात आले.
निवृत्तीनगरात पुन्हा भरला आठवडे बाजार
जळगाव : बुद्ध पौर्णिमेनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे बुधवारी काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. या सुट्टीचा फायदा घेऊन शहरातील निवृत्तीनगर भागात बुधवारी आठवडे बाजार भरला होता. या ठिकाणी १०० हून अधिक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. नागरिकांचीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली असून, अनेक तालुक्यांमध्ये कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. जळगाव तालुक्यातदेखील ३००हून अधिक इतर क्षेत्रावर कापूस लागवड आतापर्यंत झाली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चोपडा, जळगाव तालुक्यात पपई लागवडदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.