नाम पावन तिन्ही लोकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:32 AM2020-06-11T10:32:20+5:302020-06-11T10:32:35+5:30
नाम पावन तिन्ही लोकी। मुक्त झाले महापातकी॥ नाम श्रेष्ठांचेही श्रेष्ठ। नाम जपे तो वरिष्ठ॥ नाम जपे नीलकंठ ।वंदिताती श्रेष्ठ ...
नाम पावन तिन्ही लोकी। मुक्त झाले महापातकी॥
नाम श्रेष्ठांचेही श्रेष्ठ। नाम जपे तो वरिष्ठ॥
नाम जपे नीलकंठ ।वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ॥
नाम जपे हनुमंत। तेणे अंगी शक्तीवंतो॥
नाम जपे पुंडलिक। उभा वैकुंठ नायक॥
नाम ध्यानीमनी देखा। जपे जनार्दनी एका॥
नामाचे महत्त्व सांगणारा हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात एकनाथ महाराजांचा महिमा फार श्रेष्ठ आहे. त्यांनी पांडुरंगाची निष्काम सेवा केली. इतकी सेवा केली की भगवंताला त्यांच्या सेवेचा भार झाला म्हणून भगवंतांनी नाथ महाराजांना सांगितले की काहीतरी मागा पण नाथांनी पांडुरंगाला काहीच मागितले नाही. उलट नाथांनी देवाला भक्तीच मागितली. त्या भक्तीचा भार उतरवण्यासाठी पांडूरंगाने श्रीखंड्याचे रूप घेऊन छत्तीस वर्ष नाथांच्या घरी सेवा केली.
नामाला अनन्य महत्व आहे, असे नाथ महाराज या अभंगातून नामाचं महत्त्व सांगतात. नाम हे तिन्ही लोकात म्हणजे स्वर्ग मृत्यु पाताळात श्रेष्ठ आहे. हे नामस्मरण केल्याने जे महापातकी होते ते मुक्त झाले. नाम सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून नामधारक सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे. शंकराने रामनामाचा जप केला म्हणून त्यांना विषाची बाधा झाली नाही म्हणून ते महादेव झाले हनुमंताने रामनामाचा जप केला त्यामुळे जगात हनुमंत शक्तिमान झाले. असे अनेक उदाहरणे आहेत. कलियुगामध्ये नामजपाला फार महत्त्व आहे. मंत्र जपाने अध्यात्मिक शक्ती व ऊर्जा निर्माण होईल व अध्यात्मिक शक्तीनेच असाध्य कार्य साध्य होते. नाम या शब्दातील ना व म या दोन अक्षरांची उलटापालट केली तर मना शब्द तयार होतो मनाला उत्तम घडविण्याचे कार्य नामस्मरण करते. नवविधा भक्तीमध्ये श्रवण, कीर्तन,नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहे मात्र यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला तर सर्व प्रकार परस्वाधीन आहे त्यासाठी कसलीतरी सज्जता असली पाहिजे. तयारी असावी लागते. वस्तू काळवेळ यावर सर्व अवलंबून आहे मात्र नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळे हा बंध मुक्त असा भक्ती प्रकार आहे. नामाचा महिमा व त्यांची दैवी अनुभव अनेक संतांनी आपल्या अभंग काव्य ग्रंथात सांगितले आहे. साधे सोपे व सरळ म्हणजे नामस्मरण होय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केवळ नामस्मरण हा भक्तीचा प्रसार करूनच हा मार्ग किती सोपा आहे, हे दाखवून श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करण्याची शिकवण दिली. राम नामाचा महिमा अगाध आहे. राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे असा उल्लेख अभंगात आहे. नामस्मरणाची व्याप्ती वाढली की त्या व्यक्तीचे प्रभुत्व तेच लखलखते कलियुगामध्ये नामस्मरणाची आज नितांत गरज आहे. नामस्मरणाची सवय संस्कार लहानपणापासून अंगीकारणे गरजेचे आहे नामस्मरणाचे धडे लहान वयात दिल्याने शरीराला त्याची सवय होत असते.
आरंभी आवडी आदरे आले नाम। तेणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम॥ असा नामाचा अगाध महिमा आहे. त्यासाठी सर्वांनी नामजप करावा कोरोना महामारी चा संकट तत्काळ निवारण व्हावे अशी प्रार्थना प्रत्येकाने करावी.
- सुपाशेठ सदाफळे, नशिराबाद