नामस्मरणाने जीवनात मिळतो आनंद आणि सुख ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:49+5:302021-05-31T04:12:49+5:30
ऐहिक आणि परमार्थ अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी नामजप लाभदायक असतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ ...
ऐहिक आणि परमार्थ अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी नामजप लाभदायक असतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ जर देहासाठी असेल. देह सुखी असावा, देहाला रोग नसावा, इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वतःची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे. ऐहिक सुख इच्छिणार्यांना सकाम साधनेने सुख मिळते, तसेच त्यांचे दुःख न्यून होते. तर पारमार्थिक आनंद इच्छिणार्यांना निष्काम साधनेने आनंदावस्था अनुभवता येते, तसेच त्यांच्या ऐहिक दुःखातही घट होते. अध्यात्म हा केवळ बौद्धिक स्तरावर समजून घेण्याचा विषय नाही, तर प्रत्यक्षात स्वतः कृती केल्यावर त्याची अनुभव अर्थात अनुभूती घेण्याचा विषय आहे.
चौकट :
आनंद कशाला म्हणावे ?
पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी याद्वारे जे अनुभवतो ते सुख असते, ते क्षणिक असते. उदाहरण द्यायचे झाल्यास, मनपसंत पक्वान्न खाणे हे जीभेने अनुभवतो; पण तो पदार्थ आपण ठराविक प्रमाणातच खाऊ शकतो, पर्यटनस्थळी जाऊन डोळ्यांनी निसर्ग सौंदर्य पहातो; पण हे आपण २४ घंटे करू शकत नाही. एखादे कोडे सोडविल्यावर आपल्याला आनंद मिळतो; पण तो किती काळ टिकतो?; कारण ते बुद्धीचे सुख असते. चांगले गाणे ऐकल्यावर मनाला आनंद मिळतो; पण ते गाणे १०-२० वेळा ऐकल्यावर आपल्याला तेवढाच आनंद मिळतो का?, तर ‘नाही’ ! याचे कारण ते क्षणिक असते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी याद्वारे जे सुख अनुभवतो ते क्षणिक असते; कारण त्याला मर्यादा आहेत.
पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जे अनुभवतो त्याला आनंद म्हणतात. कारण तो आत्म्याकडून मिळतो. आत्म्यालाच आपण ईश्वर म्हणतो. आत्म्याकडून मिळणारे सुख २४ घंटे मिळणारे असतो. ते चिरंतन टिकणारे असते. ते कधी न संपणारे असते. तो आनंद अमर्याद असतो, ज्याच्या आपण शोधात असतो. त्यासाठी साधना करायची असते.
निरुपण : सद्गुरु नंदकुमार जाधव.