कर्जमाफीसाठी नाव आले खरे मात्र ऑनलाईन प्रक्रियेविना लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:25+5:302021-01-13T04:40:25+5:30
जळगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील मयत ...
जळगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अद्यापही या कर्जमाफीची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार वारसदार कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असून वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे भादली बु. येथील प्रमोद चावदस पाटील यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले खरे मात्र ऑनलाईन प्रक्रियेविना ते लाभापासून वंचित असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
प्रमोद पाटील यांची सव्वा दोन एकर शेती असून कोरडवाहू जमीन असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना वारंवार नापिकी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या दरम्यान २०१६मध्ये पाटील यांनी जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतले व त्याच वर्षी चावदस पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत चावदस पाटील यांचे नाव यादीत आले. मयत शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा बँकेने प्रमोद पाटील यांचे नाव या योजनेत समाविष्ट केले. मात्र त्यानंतर आधार क्रमांक, अर्ज दाखल करून घेणे अशी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नाही व कर्जमाफीचाही लाभ मिळाला नाही.
जिल्ह्यात अडीच हजार वारसदार वंचित
या संदर्भात प्रमोद पाटील यांनी सहकार मंत्री, विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले असून मयत शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून कर्जमाफीचा लाभ मिळावा व नवीन पीक कर्ज मिळावे, अशी मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास अडीच हजार तर खान्देशात पाच हजार शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.