अहवालांमध्ये नावाचा घोळ अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:54 AM2020-07-22T10:54:54+5:302020-07-22T10:55:07+5:30
जळगाव : कोरोना चाचणी अहवांलांमध्ये नावाचा घोळ होत असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे़ बाधित व्यक्ति दुसरीच असताना तिच्या ...
जळगाव : कोरोना चाचणी अहवांलांमध्ये नावाचा घोळ होत असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे़ बाधित व्यक्ति दुसरीच असताना तिच्या नातेवाईकालाच बाधित असल्याचे सांगत आशा सेविका घरी धडकल्याने खळबळ उडाली़ पिंप्राळा-हुडको आरोग्य केंद्रातून हा घोळ समोर आला आहे़
हायरिस्क कॉंटॅक्ट म्हणून एका कुटुंबाची तपासणी करण्यात आली़ त्यात महिला बाधित आढळून आल्या त्यांच्या पतीला निगेटीव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले़ त्यांनी दोन वेळा नावे तपासून घेतली़ त्यानंतर मंगळवारी अचानक त्यांना अशा सेविकांचा फोन आला व तुम्ही बाधित असून आमच्या सोबत चला असे त्यांना सांगण्यात आले़ शिवाय त्यांच्याकडे आडनावही चुकलेले होते़ यामुळ साराच गोंधळ उडाला़ सर्व तपास केल्यानंतर संबधितांच्या घराच्या काही अंतरावर एक तरूण बाधित आढळून आला होता़ नाव यांचे व आडनाव त्या तरुणाचे असा तो सगळा सावळा गोंधळ समोर आला़ मात्र, मोबाईल क्रमांक यांचा कसा, असा प्रश्न समोर आला़ दोन अहवालांमधील चार चुकांमुळे मात्र, मनस्ताप सहन करावा लागला़
पिंप्राळ्यातील दोन अहवाल कुठे
पिंप्राळा येथील २५ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यातील २३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, मात्र, दोन जणांचे अहवालच न सापडल्याने ते बसून होते़ त्यानंतर पुन्हा अखेर त्यांची तपासणी करून अहवाल देण्यात आले़ त्यामुळे कमी मनुष्यबळात असे घोळ होत असल्याचे सांगितले जात असून नोंदणीच्या कामातील हे घोळ धोकादायक ठरू शकतात, असेही बोलले जात आहे़