नांदेड येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:19 AM2018-10-07T01:19:36+5:302018-10-07T01:22:57+5:30
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे शुक्रवारी मध्य रात्रीनंतर तब्बल पाच घरे फोडून चोरट्यांनी साडे आठ तोळे सोने आणि १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव/ नांदेड : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे एकाच रात्री चोरट्यांनी पाच घरे फोडून साडे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि साडे सतरा हजाराची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्य रात्रीनंतर घडली.
पोलीस सूत्रानुसार, नांदेड येथील रहिवासी दिनकर रामचंद्र वाणी यांच्या भरवस्तीत असलेल्या बंद घराचे लोखंडी दरवाजे गॅस कटरने कापून घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी जवळपास साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व मोतीराम विठोबा भोळे यांच्या घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने व साडेसतरा हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना ५ रोजीच्या मध्यरात्रीनंतर घडली. चोरट्यांनी नांदेडमधील एकूण पाच ठिकाणी घरफोडी केली. मात्र दोन घरमालकांनीच पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री नंतर नांदेड गावात हैदोस घातला. दिनकर रामचंद्र वाणी, मोतीराम विठोबा भोळे, डॉ. बंगाली यांचा दवाखाना, मनोज झोपे, पांडूरंग नामदेव रडे यांच्या बंद घरांचे लोखडी दरवाजे गॅस कटरने कापून घरातील चिजवस्तू चोरून नेल्या.
यापैकी दिनकर रामचंद्र वाणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात घरातील तिजोरीत असलेले दोन तोळ्याचे सोन्याचे एक लॉकेट, एकेक तोळ्याचे दोन लॉकेट, १७ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा हार, २ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, ५ ग्रॅम वजनाची कर्णफुले असे एकूण साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे म्हटले आहे. या दागिन्यांची जुन्या बाजारभावाने एकूण किंमत ८८ हजार रुपये दाखविण्यात आली आहे. आजच्या बाजारभावाच्या हिशोबाने एक लाख ६५ हजाराचे हे दागिने चोरीस गेले आहेत.
तर मोतीराम विठोबा भोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या बंद असलेल्या खालच्या व वरच्या घरातून दिड तोळ्याची मंगल पोत, १ तोळ्याचे कर्णफूल, अर्ध्या तोळ्याचा सोन्याचा तुकडा व एकूण साडेसतरा हजार रुपयाची रोकड लांबविल्याचे म्हटले आहे.
श्वानपथकाला पाचारण, डीवायएसपी घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच चोपडा विभागाचे डीवायएसपी विजयकुमार चव्हाण, धरणगावचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सपोनि गायकवाड, सहा.फौजदार गंभीर शिंदे,करीम सय्यद यांनी चोरीचा पंचनामा केला. यावेळी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील सपोनि सचिन गांगुर्डे, पो हे.कॉ. साहेबराव चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.