नंदुरबारातील शंभर खेड्यांचा ‘सिलेज’ने करणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:09 PM2019-07-05T12:09:02+5:302019-07-05T12:09:31+5:30
विद्यापीठाला १३ कोटी ९५ लाखांचा निधी
जळगाव : विज्ञान -तंत्रज्ञानावर आधारीत खेड्यांचा विकास करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ‘सिलेज’ (सीटी लाईक व्हीलेजेस) हा प्रकल्प हाती घेतला आहे़ यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने मुंबई यांनी १३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. नंदुरबारातील शंभर खेड्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे़ कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़
शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या २५ एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे़ आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच व विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे , कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर हा दुसरा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे ते म्हणाल़े
शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असेल.
आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी ैविज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे.
या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक व आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.
२४ कोटींचा निधी अपेक्षित
सिलेज प्रकल्पासाठी सुमारे २४ ते २५ कोटींचा निधी अपेक्षित आहे़ पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी मिळाली असून उर्वरित निधीही लवकरच मंजूर होईल, असे यावेळी सांगण्यात आले़ नंदुरबारातील ज्या गावांमध्ये विकासच पोहचलेला नाही, त्या गावांच्या अनुभवानुसार प्राधान्याने निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांच्या कल्पकतेला महत्त्व देऊन त्यांना संधी दिली जाणार आहे़ पंढरपुरातही हा प्रकल्प राबविला गेल्याचे राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी सांगितले ़ शंभरपैकी ३५ खेडी निश्चित झाल्याची माहितीही त्यांनी दिली़