नयनो मे बदरा छाये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 06:36 PM2019-03-12T18:36:04+5:302019-03-12T18:37:32+5:30
‘नयनो मे बदरा छाये...’ यासह संगीताच्या सुमधूर तालासुरात औरंगाबाद येथील मानसी कुलकर्णी यांनी बहारदार गाणे गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. येथे जकातदार स्मृती समारोहात त्यांनी एक से एक गाणी सादर केली.
भडगाव, जि.जळगाव : ‘नयनो मे बदरा छाये...’ यासह संगीताच्या सुमधूर तालासुरात औरंगाबाद येथील मानसी कुलकर्णी यांनी बहारदार गाणे गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. येथे जकातदार स्मृती समारोहात त्यांनी एक से एक गाणी सादर केली.
सर्वोत्कृष्ट संगीत म्हणजे फक्त आणि फक्त शब्द, सूर आणि साज ह्यांचा मिलाफ असतो. 'नॉस्टॅलजिया' किंवा 'कालानुरूप बदल' या शब्दांशी त्याचा सुतराम संबंध नाही. आजकाल सगळीकडे, खासकरून टीव्ही शोमध्ये सगळ्यांना फक्त परफॉरमन्स आणि पे्रझेंटेशनविषयी बोलताना ऐकतो. निखळ, सच्च्या सुराविषयी फार क्वचित कुणी बोलतं. कारण 'ध्वनी' आणि 'संगीत' यातला फरक आजकाल कळेनासा झाला आहे. आधीच्या जमान्यातली गाणी रिमेक होऊन येताहेत. अशा सगळ्या एक प्रकारच्या सांगीतिक कमनशीब लाभलेल्या आजच्या पिढीला निखळ आनंद मिळवण्यासाठी मागच्या काळातल्या गाण्यातच रमावेसे वाटते. अशीच काही गाणी, असंच काही संगीत यांचा नजराणा रसिक प्रेक्षकांसमोर नुकताच सादर झाला. स्थळ होतं सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालयातील खुली रंगमंच आणि प्रसंग होता मधुकर सदाशीव जकातदार आणि वत्सलाबाई मधुकर जकातदार ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जकातदार परिवाराने आयोजित केलेली गानसंध्या.
श्री रागाच्या छोट्या ख्यालाने मैफिलीची सुरुवात होऊन पुढील दिड तास प्रेक्षकांपुढे भावगीतं, नाट्यगीतं आणि चित्रपटगीतांची मैफल साजरी झाली. ओंकार अनादी अनंत सारखं भक्तीगीत, मी मज हरपून बसले गं, आज कुणीतरी यावे, मी राधिका मी प्रेमिका अशी भावगीतं, नरवर कृष्णासमान, वद जाऊ कुणाला शरण, हे सुरांनो चंद्र व्हा, विकल मन आज अशी नाट्यगीतं, नयनों में बदरा छाये, बैय्या ना धरो सारखी चित्रपट गीतं सादर करुन सगळ्या रसिकांसमोर मानसीने संगीताचा सुवर्णकाळ उभा केला. अवघा रंग एक झाला ह्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
मानसीला तबल्यावर उत्तम साथ देत अहमदनगरहून आलेल्या प्रसाद सुवर्णपाठकी यांनीदेखील श्रोत्यांची प्रशंसा मिळवली. औरंगाबाद येथील विनायक पांडे यांनी संवादिनीवर पूरक साथ दिली. ज्योती वाघ, सुचेता वाघ व दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन पार पडले. सोनम पराडकर यांच्या खुमासदार निवेदनाने मैफिलीची रंगत वाढवत नेली. यशस्वीतेसाठी सर्व जकातदार परिवार उपस्थित होता.
आजच्या पिढीला उत्तम आणि अस्सल संगीत ज्ञात व्हावे,शास्त्रीय संगीताची पाळेमुळे आपल्या भागात अधिक घट्ट रुजावी ह्या प्रामाणिक हेतूने दरवर्षी प्रतिभाशाली नवोदित कलाकारांना घेऊन जकातदार परिवार दरवर्षी रसिक श्रोत्यांसाठी अशी सुरेल पर्वणी पेश करणार आहे, अशी ग्वाही यानिमित्ताने विनय जकातदार यांनी दिली.