नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:24+5:302021-08-25T04:21:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - 'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - 'नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते', अशा जहाल शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याप्रकरणी त्यांची झालेली अटक ही योग्यच असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कोकणातील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करताना कानाखाली लगावण्याची भाषा केली होती. राणेंच्या या वक्तव्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मानसिक संतुलन बिघडल्याने अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असून, त्यांचा वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप आलेच मात्र, अशा प्रकारच्या खालच्या भाषेचा वापर करणे हे चांगल्या राजकारणाचे दर्शन नाही असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.
राणे यांच्या अंगात चुडेल घुसली की काय ?
नारायण राणेंना लक्ष्य करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, तरीदेखील ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यांना काय बोलावे? याचे भान नसेल तर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे. ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा माहिती असायला हवी. पण तरीदेखील ते असे वक्तव्य करत आहे. त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये फक्त दाखल करायला नको, तर शॉकसुद्धा द्यायला हवेत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीपदी ही ते होते. त्यांच्याप्रमाणे शरद पवार, विलासराव देशमुख हेदेखील मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळातही विरोधी पक्ष होते. मात्र, त्या विरोधी पक्षांना एक प्रतिष्ठा होती. मात्र, नारायण राणे हे प्रतिष्ठा नसलेले भूत आहे. त्यांच्या अंगात चुडेल घुसली की काय? असे मला वाटते. त्यांना एखाद्या भानामतीच्या भक्ताकडे नेऊन त्यांच्या अंगात काय घुसले आहे ते पाहिले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.