नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नेते, संजय राऊतांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:33 PM2021-06-10T21:33:47+5:302021-06-10T22:20:46+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
जळगाव - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे टिकेल, असे म्हटले आहे. अंतर्गत धुसफूस असली तरीही हे सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, असे राऊत यांनी म्हटले. जळगाव दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. मात्र, येथेच पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही राऊत यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. या भेटीनंतर दोनच दिवसांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींमुळे गेल्या 7 वर्षात भाजपला राष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळालंय, असेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.
सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाच वर्ष पूर्ण करण्याची कमिटमेंट केलेली आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असून अंतर्गत धुसफूस असली तरी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकारमधील काँग्रेसच्या भूमिकेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं असतं, तसेच प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री त्यांचा असावा अशी महत्त्वाकांक्षा असते, असेही राऊत यांनी म्हटले.
I believe that Narendra Modi is the top leader of the country and Bharatiya Janata Party. No one can deny the fact that the success which the Bharatiya Janata Party has got in the last 7 years is only because of Narendra Modi: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/lYAqcmEtdS
— ANI (@ANI) June 10, 2021
सरकार 5 वर्षे टिकणार - शरद पवार
"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचंही कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी सरकारबद्दल विश्वास व्यक्त केला.
पाटील-राऊत यांची जुगलबंदी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं तर आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची, अशा शब्दात उत्तर दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही असा जोरदार टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र, वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.