अडकलेल्या परप्रांतीयांसाठी धावली नाशिक- लखनऊ श्रमिक एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 03:32 PM2020-05-02T15:32:47+5:302020-05-02T15:33:47+5:30
लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये तब्बल ३८ दिवसांनंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकावरून नाशिक येथे अडकलेल्या परप्रांतीयांसाठी नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली. भुसावळ रेल्वेस्थानकावर प्रवाशांची जेवणाची व पाण्याची सोय करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीयांना आपल्या प्रांतात जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येईल, या आशेपोटी गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतीय तग धरून होते. लॉकडाऊन-२ वाढल्यानंतर तर परप्रांतीयांचा संयम सुटला व अनेक परप्रांतीयांचे जथेच्या जथ्थे पायी गावाकडे निघाले होते. नाशिक येथे अडकलेला परप्रांतीयांची शासन दरबारी नोंद झाल्यानंतर गाडी क्रमांक ०२१२१ नाशिक रोड-लखनऊ विशेष श्रमिक गाडी परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. गाडीला १७ डबे जोडण्यात आले. यात १२ स्लीपर, तर ४ सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले. ८३९ प्रवाशांना याद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. नाशिक ते थेट लखनऊच्या प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवेश देण्यात आला. नाशिकशिवाय गाडीला भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, झांशी, कानपूर याठिकाणी फक्त तांत्रिक थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावरून कोणीही प्रवाशांना प्रवेश तसेच उतरण्याची परवानगी नाही.
सोशल डिस्टन्सिंग पाळत व सॅनिटाईज होऊन धावली गाडी
कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संसर्गाची लागण होऊ नये याकरिता गाडीच्या एका ७२ प्रवाशी क्षमता कोचमध्ये, फक्त ५२ प्रवाशांना बसविण्यात आले. गाडीला पूर्णत: सॅनिटाईज करण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क लावण्यात आले होते.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे जेवणाची पाण्याची सोय
लांब पल्ल्याच्या या श्रमिक गाडीमधील प्रवाशांसाठी भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी प्लॉट क्रमांक सहावर शनिवारी दुपारी दीडला आल्यानंतर तब्बल ८५० फूड पाकिटे तसेच हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे वितरित करण्यात आल्या. दुपारी १:५५ वाजता गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटली. दरम्यान संपूर्ण गाडीला भुसावळ रेल्वेस्थानकावर सॅनिटाईज करण्यात आले.
स्टेशन निर्देशक जी.आर.अय्यर, मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, मुख्य तिकीट निरीक्षक वि के.सचान, स्टेशन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायर, मुख्य पार्सल परीवेक्षक एच. जी आव्हाड, खानपान निरीक्षक शकील खान, जीआरपी पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, १ मे रोजी रात्री गाडी क्रमांक ०२१५३ ही सात डब्यांची नाशिक रोड ते भोपाळ गाडी मध्य प्रदेशातील अडकलेल्या परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. रात्री १२:३० वाजता गाडी भुसावळ रेल्वेस्थानकावरून धावली.
विषय गाड्यांचे फक्त तांत्रिक थांबे
या सुरुवातीच्या स्थानकावरून गाडी सोडण्यात येत आहे. तेथून तर थेट शेवटच्या स्थानकावरील प्रवाशांना गाडी प्रवेश देण्यात येत आहे. मधल्या स्थानकावर फक्त गाडीला तांत्रिक थांब्यासाठी थांबविण्यात येत आहे. यात या स्थानकावरून इतर कोणतेही प्रवासी चढू वा उतरू शकणार नाही.