नशिराबादला निवडणुकीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:53+5:302021-01-09T04:12:53+5:30
नशिराबाद : येथे घरपट्टी व पाणीपट्टी कराची सुमारे साडेतीन कोटी रुपये थकबाकी आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक उमेदवारांनी कंबर ...
नशिराबाद : येथे घरपट्टी व पाणीपट्टी कराची सुमारे साडेतीन कोटी रुपये थकबाकी आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक उमेदवारांनी कंबर कसली होती. त्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी कर भरून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते; मात्र गेल्या महिन्यात १५ दिवसातच तब्बल ६ लाख ६२ हजार १८३ रुपये करापोटी वसूल झाले आहे.
ग्रामस्थांकडे घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी वाढतच आहे घरपट्टी, दिवाबत्ती, जनरल पाणीपट्टी, स्पेशल पाणीपट्टी आदी करांची सुमारे २ कोटी ९३ लाख ८२ हजार ८१२ रुपये थकीत तर चालू वर्षाचे नऊ कोटी २२ लाख ७ हजार ९७१ रुपये असे एकूण ३ कोटी ८६ लाख १० हजार ७८३ रुपये थकबाकी आहे. दरवर्षी ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी अन्य करांपोटी कर आकारणी ग्रामस्थांना केली जाते. त्याबद्दल प्रशासनाकडून सूचनाही दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात फारच थोडे ग्रामस्थ नियमितपणे कर भरणा करीत असल्याने विविध करांच्या थकबाकीचा आकडा आतापर्यंत पावणेचार कोटीच्या घरात गेला आहे. ग्रामस्थांकडे थकबाकीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी गावातील पाणी योजना, सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, देखभाल व दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी आर्थिक तरतूद करताना ग्रामपंचायतीच्या नाकीनऊ आले आहेत. पुरेशा निधीअभावी विकास कामांना खीळ बसल्याचे स्थितीत नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने थोडीफार कर वसुली झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. कराची वसुली होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न नेहमी ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात १५ दिवसात तब्बल साडेसहा लाखांची कर वसुली झाल्याने हा चमत्कार नामनिर्देशनपत्रे सादर करणाऱ्या तब्बल ८२ उमेदवारांनी एकाच वेळी पावत्या फाडल्याने झाला असून, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.