नशिराबादला पावसाळ्यातही आठव्या दिवशी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:29+5:302021-06-18T04:12:29+5:30
ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...
ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत असल्या तरी समस्या मात्र कायमच आहे.
जिल्ह्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्व म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावात पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता अनेक योजनांचे नियोजन करण्यात आले. काही योजना अमलात आल्या; मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत. सुमारे १६ कोटी रुपयांची शेळगाव बॅरेजची पाणी योजना पाण्यातच गेली आहे. अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढले; मात्र आता गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्याकरिता एकही जण पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. शेळगाव बॅरेज पाणीयोजना सुरुवात झाल्यापासूनच यशस्वी ठरली नाही. योजनेचे वीज बिल लाखोंच्या घरात असल्यामुळे नाकापेक्षा मोती जड, अशी योजनेची स्थिती झाली आहे.
सध्या गावाला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गावातील स्थानिक जलस्रोत यांसह बेळी, वाघुर, मुर्दापूर आदी ठिकाणावरून संकलित केलेल्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो; मात्र बेळी येथून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा मुबलक आहे, मात्र नियोजन नाही. तर मुर्दापूर येथे जलपातळी खोल गेल्यामुळे पाणी पुरवठा करण्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एक वेळ, अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त आहेत.
सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.
दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहे, पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे. सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल, तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.
दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते, लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे.