नशिराबादला नागरिकांनीच केली साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:49+5:302021-03-18T04:15:49+5:30
नशिराबाद : लक्ष्मी नगरमधील नागरी समस्यांबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रहिवाशांनी स्वखर्चाने जेसीबीद्वारा साफसफाई ...
नशिराबाद : लक्ष्मी नगरमधील नागरी समस्यांबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रहिवाशांनी स्वखर्चाने जेसीबीद्वारा साफसफाई व श्रमदानातून गटारांची स्वच्छता केली. आमच्या परिसराला कुणीही वाली नाही का? असा सवालही या रहिवाशांनी उपस्थित केला.
लक्ष्मी नगर परिसरात नागरी वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र, या भागातील गटारांची दुरवस्था झाली असून, नियमित साफसफाई नसल्यामुळे गटारे तुंबून डासांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. सोबतच लोकप्रतिनिधीही दखल घेत नसल्यामुळे अखेर लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशांनी स्वखर्चाने जेसीबीद्वारे साफसफाई व श्रमदानातून गटारांची स्वच्छता केली. यानंतर तरी ग्रामपंचायत येथील समस्यांकडे लक्ष देईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी राहुल चौधरी, बापू चौधरी, भूषण साळुंके, गणेश कोळी, नरेंद्र निकम, पिंटू पवार, रवींद्र लोहार, सोपान माळी व महिलांनी परिश्रम घेतले.