‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:45 PM2019-09-07T12:45:05+5:302019-09-07T12:45:30+5:30
पुरस्काराने सन्मानित
जळगाव : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्ली येथे जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील ५ राज्ये व २० जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी स्मृती इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी उपस्थित होते. या समारंभास महिला व बाल विकास मंत्री देवोश्री चौधरी, सचिव रवींद्र पनवर, अपर सचिव के. मोझेस चलाई उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्याचा सन्मान
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानात जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण ८४१ वरून ९२५ पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी ही या जिल्ह्यास या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल जळगाव जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकचळवळीच्या माध्यमातून हे अभियान राबविले. तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, किशोर राजे निंबाळकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यापुढेही मुलींचा जन्मदर तसेच शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.