गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:54+5:302021-01-22T04:15:54+5:30
विकेंद्रीकरण, पर्यावरणपूरकता, उपयोगी व शाश्वत संशोधनाच्या माध्यमातून गाव-खेड्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे व ग्राम स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. ...
विकेंद्रीकरण, पर्यावरणपूरकता, उपयोगी व शाश्वत संशोधनाच्या माध्यमातून गाव-खेड्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे व ग्राम स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. याच संकल्पनेचे बीजारोपण विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन आहे. पाचवी ते सातवी- प्रथम गट, आठवी ते दहावी- द्वितीय गट अशा दोन गटात स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, स्पर्धेत शाळेचा सहभाग नसला तरी विद्यार्थी वैयक्तिकरीत्या स्वतंत्रपणे किंवा संघ रूपात (ग्रुप) स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना आपल्या मॉडेल / संशोधनाचा व्हिडिओ दिलेल्या लिंकवर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी पर्यावरण, ऊर्जा, सूचना व दळणवळण, स्वच्छता, रोजगार व ग्रामोदय, कृषी, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्राधान्य दिले जाईल. ३० जानेवारीपर्यंत प्रवेश पाठविण्याची अंतिम तारीख आहे. तर मॉडेल तथा संकल्पना सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असेल. या स्पर्धेचा निकाल २८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञानदिनी जाहीर केला जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे (प्रथम) ₹३१०००/-, (द्वितीय) ₹२१०००/-, (तृतीय) ₹१५०००/- आणि प्रोत्साहनपर ₹५०००/ मूल्याचे शैक्षणिक साहित्य प्रदान केले जाईल. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिल्या तीन स्पर्धकांना भरघोस पारितोषिके तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि निवड समितीमध्ये डॉ. अनिल काकोडकर, (अध्यक्ष, गांधी रिसर्च फाउंडेशन) डॉ. सुदर्शन आयंगार, (संचालक, गांधी रिसर्च फाउंडेशन) प्रो.जे. बी.जोशी, (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) डॉ. विपिन कुमार, (संचालक, राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान) अनंत देशपांडे, (कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद) या मान्यवरांचा समावेश आहे. स्पर्धकांनी ३० जानेवारीपर्यंत http://gandhifoundation.net/NICF/index.htm या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जीआरएफ व मराठी विज्ञान परिषदेने केले आहे.