राष्ट्रीय मतदार दिन विशेष : तरुणाई म्हणते आम्ही ‘मत’वाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:56 PM2019-01-24T17:56:23+5:302019-01-24T17:56:58+5:30

प्रचारतंत्राला भूलून नव्हे तर जागरुकपणे करणार मतदान

National voter day special: Young people say we are 'vote' | राष्ट्रीय मतदार दिन विशेष : तरुणाई म्हणते आम्ही ‘मत’वाले

राष्ट्रीय मतदार दिन विशेष : तरुणाई म्हणते आम्ही ‘मत’वाले

Next

चाळीसगाव, जि. जळगाव : २०१९ हे निवडणूक वर्ष असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याचे सर्वत्र चित्र आहे. त्यामुळे पडघम वाजण्यासह आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडू लागला आहे. तरुणाईमध्येही मतदानाबाबत उत्सुकता असून तितकीच जागरुकताही आहे. प्रचारतंत्राला भुलून नव्हे तर जागरुपणे आम्ही मतदानाचा हक्क बजावणार असल्याचा सूर तरुणातून उमटला.
भारत तरुणांचा देश असून तरुण मतदारांची संख्याही मोठी असल्याचे चित्र देशात आहे. २५ जानेवारी रोजी असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला तरुणाईचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. या वेळी सरकारचे धोरण, ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया, विरोधी पक्षांची स्थिती या विषयीदेखील मनमोकळेपणे संवाद साधत राजकारण्यांच्या भांडणात प्रश्नांचे गुंते सुटण्याऐवजी वाढतात असे सांगत सामान्य माणसाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, अशी अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आली.
तरुण मतदाराच्या देशा
भारतात तरुण मतदारांची संख्या वाढत आहे. ग्रामीण व शहरी पातळीवर मतदार नोंदणी राबविली जात असून अलीकडच्या काही वर्षात २५ जानेवारी मतदार दिवस साजरा होऊ लागला आहे. यादिवशी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम पार पाडले जातात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी मतदान करण्याऱ्यांची संख्या चिंताजनक वाचते. असे असले तरी तरुणांमध्ये उत्साह असून आम्ही यंदापासून ‘मत’वाले झालो असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीत हे नवमतदार काय भूमिका घेतात यालादेखील महत्व आले आहे.
महाविद्यालयात जनजागृती
चाळीसगाव महाविद्यालय व चव्हाण महाविद्यालयात तरुणाईचे प्रबोधन व्हावे म्हणून मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. चव्हाण महाविद्यालयात यासाठी फोरमची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव यांनी दिली. चाळीसगाव महाविद्यालयातही उपक्रम सुरु असल्याचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी सांगितले. चव्हाण महाविद्यालयात फोरमचे कामकाज प्रा.डॉ.विजय शिरसाट पाहतात.

पहिल्यांदाच मतदानाला सामोरा जाणार असल्याने उत्सुकता आहे. प्रचार, आश्वासने याऐवजी व्यक्तीला पाहून मला मतदान करायचे आहे. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. चव्हाण महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती अभियानाचा मी कॅम्पस अ‍ॅबेंसिडरही आहे. प्रचारतंत्राचा प्रभाव पडतो. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मजूर वर्गाला मोठी झळ बसली. योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी आपलीच आहे.
- आदर्श मिसाळ, विद्यार्थी, तृतीय वर्ष कला शाखा

सरकारचे अश्वासनेही पूर्ण झाली नाही. मात्र ईव्हीएम पद्धती मतदान घेण्यासाठी उत्तम आहे. तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. मतदारांचा कल आता विरोधी पक्षांकडे झुकू लागला आहे. २०१९च्या निवडणुकीत मी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. याआगोदर ग्रा.पं.निवडणुकीत मतदान केले आहे.
- सारिका शितोळे, विद्यार्थिनी

सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याची केलेली घोषणा फसवी होती. ग्रामीण भागात अजूनही प्रश्न तुंबले आहेत. शेतीत कुटुंबाला मदत करतो. त्यामुळे शेतीतील प्रश्न मी जाणून आहे. मी निर्भयपणे मतदान करणार आहे. मतदान करताना दबावाला बळी पडू नये. पैसे घेऊन मतदान करणे गैर आहे. या निवडणुकीत मी पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया अनुभवणार आहे.
- श्रीराम राठोड, विद्यार्थी.
सरकारचे काही चांगले कामे आहेत. २०१९च्या निवडणुकीत मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. नोटाबंदी, परराष्ट्र धोरण यात सरकारचे काम क्रांतीकारी झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा सशक्त झाली आहे. समाजमाध्यमाचा वापर मतदार जनजागृतीसाठी व्हावा. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये मतदार जनजागृतीची मोहिम राबवली जावी.
- रोहित पाटील, विद्यार्थी, तृतीय वर्ष कला शाखा

माझी मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. मात्र मतदान करण्याविषयी मी फारसी उत्सुक नाही. राजकारण, मतदान, लोकशाही याबाबत मला फारसा रस नाही. राजकारण्यांच्या भांडणात प्रश्नांचे गुंते सुटण्याऐवजी वाढतात. सामान्य माणसाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात. त्याला आवश्यक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत.
- जयश्री पाटील, विद्यार्थिनी, कला शाखा.

आपली लोकशाही प्रगल्भ असून मतदान करताना ‘नोटा’ अधिकारही वापरता येतो. हा अधिकार वापरणे म्हणजे दुरुपयोग नव्हे तर आपले मत मांडणे होय. यामुळे आपण एकप्रकारे तुम्ही योग्य नाही, असेच सांगत असतो. अर्थात आपल्याकडे नोटा अधिकाराविषयी असे गैरसमजही अधिक आहे. सरकारच्या काही योजना फसव्या आहे.
- वैष्णवी गवांदे, तृतीय वर्ष, विज्ञान शाखा

Web Title: National voter day special: Young people say we are 'vote'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव