भाजपचे दोन मते फुटल्याने पहूरला राष्ट्रवादीचा उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:37 PM2019-06-03T22:37:06+5:302019-06-03T22:37:12+5:30
भाजपच्या सत्तेला सुरुंग : श्यामराव साळवे यांनी मारली बाजी
पहूर, ता. जामनेर : पेठ ग्रामपंचायत मध्ये उपसरंपच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे दोन मते फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होऊन उपसरपंचपदी श्यामराव नामदेव सावळे यांनी विजय प्राप्त केला असून भाजपाचे बहुमत असतांनाही राष्ट्रवादीने भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ते भाजपचे बंडखोर सदस्य कोण? हा स्थानिक भाजपासाठी चिंतनाचा विषय आहे.
भाजपाने गेल्या वर्षी प्राप्त केला होता ऐतिहासिक विजय
भाजपाने गेल्या वर्षी निसटता ऐतिहासिक विजय प्राप्त करून सत्ता स्थापन केली होती. यात भाजपाचे नऊ सदस्य तर राष्ट्रवादीचे आठ सदस्य असे संख्या बळ होते.
भाजपाचे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने एप्रिलमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
या रिक्त पदासाठीसोमवारी पिठासीन अधिकारी सरंपच निता रामेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यासाठी भाजपाकडून महेराजबी शेख बिसमिल्ला यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी कडून श्यामराव नामदेव सावळे यांचा अर्ज होता. त्यांना भाजपच्या दोन बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने श्यामराव सावळे यांना दहा मते मिळाली. यामुळे त्यांची उपसंरपच पदी निवड झाली. तर महेराजबी यांना फक्त सात मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला, गोपनीय पध्दतीने मतदान घेण्यात आले आहे.
यामुळे काही काळ ग्रामपंचायत मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी भाजपाच्या सत्तेत वाटकरी झाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंनंद साजरा केलो. तर भाजपच्या गोटात धक्काच बसल्याचे दिसून आले आहे. निवडणूकीसाठी दोन्हींकडून पाच अर्ज दाखल झाले होते.
माघारीच्या दरम्यान तीन अर्ज मागे घेण्यात आले होते. महेराजबी शेख बिसमिल्ला या सहा नंबर वाडार्तून ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत.
माजी सरंपंचाचे वर्चस्व
माजी सरंपच प्रदिप लोढा यांनी पेठ ग्रामपंचायतची एक हाती सत्ता पंचवीस वर्षे हातात ठेवली. गेल्या वर्षी त्यांच्या हातून सत्ता निसटली. मात्र उपसरपंच पदासाठी त्यांचे समर्थक श्यामराव सावळे यांना त्यांनी भाजपच्या दोन सदस्यांच्या सहाय्याने भाजपच्या सत्तेत सहभागी केल्याने त्यांच्या चाणक्य नितीचा अनुभव पुन्हा पहूकरांना आला असून लोढांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.
कसबेची पुनरावृत्ती
पहूर कसबेत तीन वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बहूमत होते. मात्र एक भाजपचे मत फुटल्याने राष्ट्रवादीचे योगेश भडांगे उपसरपंच झाले आहे. याचीच पुनरावृत्ती पेठ ग्रामपंचायत मध्ये झाल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र पेठ ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे फुटलेले बंडखोर सदस्य दोन कोणते असा प्रश्न समोर आला आहे.
निवडणुकीच्या वेळी रामेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, माजी सरंपच प्रदिप लोढा, संदीप बेढे, आर.बी.पाटील, समाधान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाला अंतर्गत गटबाजीचा फटका
पेठ ग्रामपंचायतची सत्ता हातात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून राजकीय रणनीतीचा वापर करीत तत्कालीन सरंपच प्रदिप मोहनलाल लोढा यांच्या ताब्यातून सत्ता हातात घेतली. सरंपचपदी भाजाच्या निता पाटील यांची लोकनियुक्त मधून निवड झाली. मात्र सत्ता हातात घेतल्या पासून अंतर्गत हेवेदावे पाहण्यास मिळाले. प्रत्येक कार्यक्रमांमधून गटबाजी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फायदा विरोधी गटाने उचलून भाजपाचे दोन बंडखोर सदस्य आपल्या गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे.