राष्‍ट्रधर्मी सिंहगर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:45+5:302021-07-25T04:14:45+5:30

लोकमान्य टिळक यांनी केली युगसंमत विचारधारा आणि विवेकसंपन्‍न उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी लेखक : प्राचार्य डॉ. ...

Nationalist roar | राष्‍ट्रधर्मी सिंहगर्जना

राष्‍ट्रधर्मी सिंहगर्जना

googlenewsNext

लोकमान्य टिळक यांनी केली युगसंमत विचारधारा आणि विवेकसंपन्‍न उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी

लेखक : प्राचार्य डॉ. विश्‍वास पाटील

आज लोकमान्‍य टिळक यांच्‍या स्‍मृतीचे एकशेएकवे वर्ष. आज त्‍यांच्‍या गुणसंपदेला अभिवादन करत असताना त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्‍वाच्‍या निरपवाद सर्वमान्‍यता पावलेल्‍या पत्रकारितेचे स्‍मरण करणे कालोचित ठरावे. भारतीय पत्रकारितेच्‍या ऊर्जस्‍वल परंपरेचा पाया रचणारे टिळक आहेत. उच्‍च विद्याविभूषित जन जनसामान्‍यांच्‍या भाषेत बोलत असत, असा तो काळ होता. जनतेच्‍या ठायी साहस व निर्भयतेचा अभाव होता. दिशा सुन्‍न होत्‍या. मार्ग अस्‍पष्‍ट होता. अशा परिस्थितीत एक आत्‍मप्रत्‍ययी समाज उभा करण्‍याचे महत्‍कार्य टिळकांच्‍या पत्रकारितेने केले. टिळकांच्‍या ज्ञानमार्गाच्‍या दिशा अध्‍ययन, अध्‍यापन आणि संशोधन-अनुसंधानाशी संबंधित होत्‍या.

आपल्‍या नाट्यपूर्ण आयुष्‍यात त्‍यांनी तोफ व तलवारीसारखी लेखणी हाती धरली. लोकमताच्‍या प्रशिक्षणासाठी टिळकांनी शब्‍द शस्‍त्रास्‍त्रांचा प्रयोग केला. त्‍यांचे सरळ-साधे व प्राणवान शब्‍द जनांच्‍या हृदयाचा ठाव घेत असत. टिळकांच्‍या वाणी आणि लेखणीने जनमनाला अभिषिक्‍त केले. त्‍यांचे मन, वाणी व विचार एकाकार होते. त्‍यांनी उचललेल्‍या प्रत्‍येक पावलाची शक्‍ती लोकमानसाचे गहिरे स्‍पंदन होते.

खरे पाहू गेल्‍यास पत्रकारितेचे स्‍वरूप प्रासंगिक असते, पण टिळकांची पत्रकारिता शाश्‍वत विचार दानाचे काम करते. त्‍यांनी केवळ युगसंमत विचारधारेला मार्गदर्शन केले, असे नव्‍हे तर परमताचे विवेकसंपन्‍न खंडन करून येणाऱ्या उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी केली. त्‍यांच्‍या वृत्तपत्रीय लेखनाला चिरकाल टिकून राहण्‍याचे सामर्थ्‍य लाभले. ही पत्रकारिता एका प्रभावी राजनेत्‍याची पत्रकारिता होती. त्‍यांच्‍या लेखनाला राष्‍ट्रीय संदर्भाचे वैचारिक अधिष्‍ठान लाभले होते. स्‍वराज्‍याचा मंत्रजागर करून टिळकांनी या राष्‍ट्रवादाच्‍या रोपाला आपल्‍या रक्‍ताने सिंचित केले.

टिळकांची पत्रकारिता एका प्रभावशाली राजकीय पंडिताची पत्रकारिता आहे. यात सुसूत्रता आहे. इतिहासाचा अभ्‍यास करत असताना त्‍यांनी सातत्‍याने इतिहासाची पुनर्मांडणी व पुनरुत्‍थानाचा विचार केला आहे. उत्‍सवांना त्‍यांनी जागरणाचे रूप दिले. सामाजिक मंगलेच्‍छेत रूपांतरित केले. अध्‍यात्‍माऐवजी ईहलोकाचा अभिनव संदर्भ दिला. त्‍यांच्‍या गणिती प्रतिभेने सत्त्‍व, स्‍वत्‍व आणि सद्भावाची पेरणी केली. त्‍यांची राष्‍ट्रीय संकल्‍पना भाषा, भूषा, भवन, भजन, भोजन यासारख्‍या वा धर्म, पंथ, जात, गट, वर्ग यासारख्‍या मर्यादेत सीमित नव्‍हती. तिला एक भव्‍य परिमाण त्‍यांनी अर्पण केले होते. त्‍यांच्‍या पत्रकारितेने केवळ समकालीनच नव्‍हे तर उत्तरवर्ती पत्रकारितेला एक पाठ शिकवला. त्‍याग, संयम आणि भाषिक विवेकाचा पाठ शिकवला.

तात्‍कालिक व समकालीन प्रश्‍नांच्‍या संदर्भात त्‍यांनी केलेली मीमांसा आजही उपयुक्‍त व सार्वकालिक वाटते. आपल्‍या चिरंतन लेखन योग्‍यतेमुळे हे लेखन आजही प्रासंगिक आहे. त्‍यांच्‍या लेखणीचा प्रवास हा सत्‍यापासून सत्‍यापर्यंतचा प्रवास आहे. शाश्‍वत मूल्‍यवत्तेवर त्‍यांची नजर खिळलेली असल्‍यामुळे या लेखनाला असा शाश्‍वताचा सहज स्‍पर्श झाला आहे. टिळक पत्रकारिता लोकमतसमनुयोगाची संजीवक दृष्‍टी अर्पण करणारी पत्रकारिता आहे. शतकापूर्वीच्‍या या पत्रकारितेच्‍या काही पाऊलखुणा आजही प्रत्‍ययकारी आहेत. पत्रकारितेच्‍या क्षेत्रात टिळक म्‍हणजे टिळक आहेत, या नावाला कुठलाही पर्याय नाही. आपल्‍या पूर्ववर्ती पिढीचे काही ऋण त्‍यांच्‍यावर सिद्ध करणे कमालीचे अवघड आहे. ते ‘स्‍वयंमेव मृगेंद्र’ आहेत. त्‍यांनी स्‍वत: आपला मार्ग शोधला व त्‍यावर अखंडपणे मार्गक्रमण करत राहिलेत. त्‍यांच्‍या लेखनाला सातत्‍याने राजद्रोहाचा दाह झेलावा लागला. केवळ टीकाटिप्‍पणी करणे व विपक्षींचे गुण-दोष मांडायचे काम त्‍यांनी केले नाही. स्‍वत: कायदेपंडित असल्‍यामुळे कायदा व न्‍याय या मूल्‍यांवर त्‍यांची अपरिमित श्रद्धा होती. न्‍यायालयात ते सतत पराभूत होत राहिलेत, पण जनतेच्‍या आणि जनता जनार्दनाच्‍या न्‍यायालयाने मात्र त्‍यांना निर्दोष सिद्ध केले. त्‍यांनी देशाची दशा अभ्‍यासली आणि कार्याची दिशा बदलली. एक नवा मार्ग दाखवला. त्‍यांच्‍या राजकीय चिंतनधारेचा आधारबिंदू लोकमत होता. इंग्रजांनी त्‍यांना दिलेल्‍या शिव्‍यांचेही श्‍लोक झालेत. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही होती शिवीच, पण तिचे रूपांतर आपल्‍या भव्‍य कर्तबगारीने त्‍यांनी बिरुदात करून टाकले. पत्रकारिता त्‍यांच्‍यासाठी देशभक्तीचा एक बलिपंथी मार्ग होता. त्‍यांच्‍या पत्रकारितेची त्रिधारा होती जनमनात चैतन्‍याचे जागरण, अन्‍याय व अत्‍याचारांच्‍या विरोधात विद्रोह, सरकारच्‍या विरोधातली प्रश्‍नांकित तर्जनी. ही अग्निमुखी पत्रकारिता होती, आज त्‍यांचे स्‍मरण करत असताना त्‍यांच्‍या पत्रकारितेला नमन करणे ही कालोचित बाब आहे.

Web Title: Nationalist roar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.