जळगावात ‘राष्ट्रवादी’चे नियोजन अद्यापही कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:45 PM2018-07-23T13:45:35+5:302018-07-23T13:47:05+5:30
जळगाव : मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवार दिलेल्या प्रत्येक प्रभागाला तीन निरीक्षक पदाधिकारी दिलेले असले तरीही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले दिसून येत नाही.
सभांचे नियोजन सुरूच
पक्षातर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन सुरूच आहे. २५ ते ३० जुलै या कालावधीत या सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून आता त्याची मागणी प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या सभांची मागणी करण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीत दरवेळी होणारे मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वळसेपाटील यांच्या उपस्थितीतच बैठकांच्या फेऱ्या मागून फेºया झाल्या. मात्र तरीही प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मात्र तब्बल १२ ठिकाणी आघाडीतील पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले. माघारीनंतरही तब्बल ८ ठिकाणी उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे आघाडीचा फियास्को झाला आहे.
मोजकेच पदाधिकारी रस्त्यावर
राष्टÑवादीने वळसेपाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी नियोजन केले. मात्र ते अद्यापही कागदावरच असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व काही जिल्हा पदाधिकारी वगळता जिल्ह्यातील कोणतेही पदाधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले दिसून येत नाहीत. त्यांच्याच उपस्थितीत उमेदवारांच्या प्रभागांमधून रॅली काढण्यात येत आहेत. पक्षाचा उमेदवार असलेल्या प्रत्येक प्रभागाला ३ निरीक्षक देण्याचा निर्णय झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी मात्र सुरू झालेली दिसत नाही. प्रचार संपण्यास जेमतेम आठ दिवसांचा कालावधी उरला असताना जिल्ह्याचे निरीक्षक वळसे पाटील यांना अद्यापही जिल्ह्यात यायला वेळ मिळालेला नाही.