जळगावात रेल्वे गेटवर बस धडकली, नवजीवन एक्सप्रेसचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:50 PM2017-11-24T12:50:57+5:302017-11-24T13:18:22+5:30
स्वयंचलीत गटमुळे गोंधळ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - यावल येथून जळगावला येणारी एस.टी.बस सुरत रेल्वे लाईनच्या गेटवर धडकल्याने हे गेट तुटले व त्यामुळे तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. या अपघातामुळे तब्बल पाऊण तास नवजीवन एक्सप्रेस सूरत रेल्वे गेट नजीक थांबली होती. याप्रकरणी बस चालक जगन्नाथ विश्वनाथ धनगर (वय 31, यावल आगार) यांच्याविरुध्द रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस जप्त करण्यात आली आहे.
दुहेरीकरणामुळे जादा वाहतूक
जळगाव-सुरत या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण झाल्याने या मार्गावर रेल्वेच्या गाडय़ांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेट बंद होण्याचेही प्रमाण वाढले, त्याचा परिणाम म्हणून रेल्वे गेटच्या दोन्ही बाजुंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. त्यातच येथे आता जुने गेट काढून नवीन स्वयंचलित गेट बसविण्यात आले आहे. हे गेट इलेक्ट्रानिक बटन दाबल्यावर उघडते व बंदही होते. दोन्ही गेट एकाच वेळी चालू-बंद होण्याऐवजी प्रारंभी एक गेट उघडते तर दुसरे बंद असते. त्याला उघडायला वेळ लागतो. पहिले गेट उघडताच वाहने थेट मार्गाला लागतात व लगेच पुढे गेट बंद असल्यामुळे रुळावरच थांबून राहतात. त्याच्यात एखादे वाहन वेगात थेट गेटवर धडकते. तसाच प्रकार गुरुवारी सकाळी झाला.
गेटचे 40 हजाराचे नुकसान
बसच्या धडकेत गेट तुटल्यामुळे त्याचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे रेल्वे कर्मचारी व एस.टी.कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात दोन्हीकडील वाहतूक प्रचंड खोळंबली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी व सहका:यांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेतली. चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करुन भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता सायंकाळी त्याची जामीनावर सुटका झाली.
दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा
या अपघातामुळे शिवाजी नगर व एसएमआयटी परिसरात दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे सुरक्षा बलाने साडे बारा वाजेर्पयत कसरत करुन ही वाहतूक सुरळीत केली.तीन तास या भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्रीही आठ वाजता या गेटवर रिक्षा धडकली होती. त्यात रिक्षाचेच काच फुटून नुकसान झाले.