काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:58 AM2018-05-06T11:58:30+5:302018-05-06T11:58:30+5:30

जळगाव जिल्ह्यातील घटना

Navy engineer died in accident | काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

काकाचे उत्तरकार्य आटोपून परतणाऱ्या नौदलातील अभियंत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

Next
ठळक मुद्देआजीच्या फोनमुळे पटली ओळखसुट्टी वाढविली आणि जीवावर बेतले

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - उत्तरप्रदेशात काकाचे उत्तरकार्य आटोपून मुंबई येथे कामावर परतणाºया राहुलकुमार संतोषकुमार पाल (२४, रा. ठाकूर पूर्व, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) या नौदलात अभियंता असलेल्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री रावेर ते वाघोड दरम्यान घनदाट जंगलात घडली. शुक्रवारी त्याची ओळख पटली व शनिवारी त्याचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
राहुलकुमार पाल हा मुंबई येथे नौदलात आयएनएस म्हैसूर बटालियन या जहाजावर अभियंता आहे. तो सुट्टी घेऊन गावाकडे गेला. मात्र याच दरम्यान त्याच्या काकाचे अपघाती निधन झाले त्यामुळे तो तेथेच थांबला. उत्तरकार्य झाल्यानंतर तो मुंबई येथे कामावर जाण्यासाठी गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेसने निघाला असताना गुरुवारी मध्यरात्री रावेर ते वाघोड दरम्यान ४८५/१३/१५ कि.मी. खांबाजवळ रेल्वेतून पडला. जंगल परिसर असल्याने तो तेथेच पडून होता. त्यानंतर रेल्वे रूळ पाहणीदरम्यान रेल्वे कर्मचाºयांना मृतदेह आढळून आला. या बाबत भुसावळ स्थानकप्रमुखांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी सहायक फौजदार अनंत रेणुके, पो.कॉ. श्याम निखारे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
राहुलकुमार रेल्वेतून पडल्यानंतर तो अनोळखी म्हणून त्याची नोंद होती. घटनास्थळावर त्याच्या मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या वेळी त्याचे सिमकार्ड पोलिसांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये टाकले व ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी या क्रमांकावर राहुलकुमारच्या आजीच्या (आईच्या आईचा) फोन आला व त्याची विचारणा करू लागली. त्या वेळी पोलिसांनी त्याची संपूर्ण माहिती घेतली व त्याची ओळख पटली. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणला आणि येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
सुट्टी वाढविली आणि जीवावर बेतले
राहुलकुमार हा सुट्टीवर गेला असताना काकांचे निधन झाल्याने त्याने सुट्टी वाढविली. यामुळे रेल्वेच्या आरक्षित तिकिटाची तारीख निघून गेली. त्यामुळे नंतर त्यास जनरल बोगीतून निघावे लागले व याच बोगीतून पडून राहुलकुमारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मुंबईला नौदलात समजल्यानंतर राहुलकुमारचे सहकारी जळगाव जिल्हा रुग्णालयात पोहचले.
वडीलही नौदलात
राहुलकुमार याचे वडील संतोषकुमार पाल हेदेखील कोची येथे नौदलात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते जळगावला यायला निघाले होते.

Web Title: Navy engineer died in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.