राष्ट्रवादी नगरसेवक ठाकूर यांनी स्वखर्चाने टाकला २० डंपर मुरूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 02:43 PM2020-08-30T14:43:37+5:302020-08-30T14:43:55+5:30
अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्ण वाट लागली
भुसावळ : अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून, प्रभाग २४चे राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी २० डंपर मुरूम टाकला.
शहरात अतिशय संथ गतीने अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. संपूर्ण रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखलमय रस्ते झाल्यामुळे पाय ठेवणेदेखील कठीण झाले आहे. साहजिकच याचा रोष नगरसेवकांवर प्रभागातील नागरिक काळात आहे. प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली २० डंपर मुरूम प्रभागातील नारायणनगर, महेशनगर, हिरानगर, कलानगर, तुकारामनगर याठिकाणी टाकला. संपूर्ण प्रभाग खड्डेमुक्त व चिखलमुक्त करण्यासाठी ३० डंपर अजून टाकण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवर तरी मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.