राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात
By अमित महाबळ | Published: July 7, 2024 08:54 PM2024-07-07T20:54:32+5:302024-07-07T20:54:44+5:30
पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जळगावात येऊन सर्वांसमक्ष आणि बंद दाराआड अनेकांची मते जाणून घेतली.
जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा नवीन कोणाच्या हातात द्यायची की, जुनेच पदाधिकारी कायम ठेवायचे, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत. त्यामुळे काहींच्या भावना रवींद्र पाटील यांना कायम ठेवण्याच्या असल्या किंवा ज्येष्ठ नेत्यांना बदल व्हावा, असे वाटत असले तरी प्रदेशवरून काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जळगावात येऊन सर्वांसमक्ष आणि बंद दाराआड अनेकांची मते जाणून घेतली. त्याचा अहवाल ते प्रदेशाध्यक्षांना सादर करणार आहेत. त्यानुसार पक्षाकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारी बैठक पंधरा दिवसांपूर्वी झाली होती. त्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष व इतर पदाधिकारी बदलावेत, असा ठराव एकमताने करण्यात आला आहे. यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी (दि. ७) जळगावला आले होते. पक्षाच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी पक्षाचे निरीक्षक ॲड. प्रसेनजित पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, श्रीराम पाटील, मंगला पाटील, विलास पाटील, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, नामदेव चौधरी, एजाज मलिक आदी उपस्थित होते.