“१९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला”: एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:05 PM2022-03-22T17:05:14+5:302022-03-22T17:06:12+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान मोदींनाही मान्य नसेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

ncp eknath khadse replied bjp devendra fadnavis statement on balasaheb thackeray | “१९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला”: एकनाथ खडसे

“१९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला”: एकनाथ खडसे

Next

जळगाव: एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढत चाललेली दिसत आहे. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) यांनी शिवसेनेवर टीका करताना जनाब बाळासाहेब असा शब्दप्रयोग केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना, १९९३ ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला, असे म्हटले आहे. 

हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या, असे एकनाथ खडसे यांनी नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस मला वडीलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलेले वक्तव्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला

देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांना जनाब म्हटले. माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान राहिले आहे. बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला आहे. मी त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसोबत गेलो आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्यातला जाज्वल्य अभिमान त्यांच्या लेखणीतून मी अनुभवलेला आहे. १९९३ मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा मी आमदार होतो. तेव्हाची बाळासाहेबांची भूमिका अतुलनीय आहे. बाळासाहेब होते, म्हणून त्या काळात मुंबईतला हिंदू सुरक्षित राहिला. हे कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हादरलेला आणि घाबरलेला होता. रक्ताचे पाट वाहात होते. अशा काळात मदतीला कुणीही गेले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक रस्त्यावर उतरलेले मी पाहिले, अशी आठवण खडसे यांनी सांगितली. 

पंतप्रधान मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला 

देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधी अनुभवले नाही, अशी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Web Title: ncp eknath khadse replied bjp devendra fadnavis statement on balasaheb thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.