Jayant Patil: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर, पक्षातील कार्यकर्त्यांचीही वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 05:08 PM2022-08-28T17:08:48+5:302022-08-28T17:10:51+5:30
राष्ट्रवादीत पक्षासाठी खस्ता खाणारे कमी झाले आहेत. संघटनात्मक बांधणीची कामे करायला कोणी तयार नाही
अमित महाबळ
जळगाव : देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थिती वाईट झाली आहे. त्यांच्याकडे नेतेच काय, हाडाचे कार्यकर्तेही राहिले नाहीत. त्याच मार्गावर आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीदेखील जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नेमक्या याच गोष्टीची सल नेत्यांनी बोलून दाखविली. कार्यकर्ते नसतील, तर कोणाच्या जिवावर निवडणुका जिंकायच्या, हा प्रश्न त्यांना छळायला लागला आहे. कारण, घोडामैदानही लांब राहिलेले नाही.
राष्ट्रवादीत पक्षासाठी खस्ता खाणारे कमी झाले आहेत. संघटनात्मक बांधणीची कामे करायला कोणी तयार नाही. जे आहेत ते मोजके. बहुतेकांना मिरवून घेण्यात रस अधिक. जळगावपेक्षा मुंबईच्या वाऱ्या करून नेत्यांसोबत फोटो काढून घेण्याची हौस दांडगी आहे. नेतेही अशांना विचारत नाहीत, जिल्ह्यात तुम्ही पक्ष किती उभा केला? कहर म्हणजे कामांपेक्षा प्रसिद्धीचा सोस एवढा वाढला आहे, की स्थानिक पातळीवरील बातम्यांमध्ये नावे येत नाहीत म्हणून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या जात आहेत. पक्षाचे वर्चस्व कमी होत असल्याचे नाही; पण नावे येत नसल्याचे दु:ख भारी आहे !
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे; पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावागावांत संघटन राहिलेले नाही, हे कोणी नाकारू शकणार नाही. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कमतरता जाणवली असल्याचे सांगून बोलघेवड्यांना आरसा दाखवला आहे. देशातील सगळ्यांत मोठा पक्ष भाजप. त्यांची बूथरचना मजबूत आहे. राष्ट्रवादीत प्रत्येक बूथला सक्रिय कार्यकर्ते आहेत का ? २० सरचिटणीस, २५ उपाध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी काय ? प्रदेशाध्यक्ष आले, तर त्यांच्या बैठकीला महत्त्वाचे नेते गैरहजर होते. पक्ष या बेशिस्तीची काय दखल घेणार? चेंडू जिल्हाध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीनंतर आंदोलन झाले. त्यावेळी किती महिला हजर होत्या? बैठकीसाठी पक्ष कार्यालयातील सभागृहाची अर्धी बाजू महिलांनी व्यापली होती. आंदोलनाची वेळ आली, तर त्यांतील ५० टक्केही दिसल्या नाहीत. अशाने पक्ष वाढणार आहे का? प्रदेशाध्यक्षांसमोर अनेकांचा तक्रारीचा मोठा सूर होता; पण पक्षासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. नेत्यांच्या पुण्याईवर पक्ष किती दिवस चालणार, हे खडसेंनी विचारणे चुकीचे नाही. अडीच वर्षे सत्ता असताना पक्षाच्या नेत्यांनीच थारा दिला नाही म्हटल्यावर कार्यकर्ता नाराज आहे. दुसरीकडे, भाजपची सत्ता आल्यावर त्यांचेच लोक फोन करून ‘तुमची कामे असतील, तर सुचवा’ असे सांगत असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहेत. कार्यकर्ता जोडण्याचा दोन पक्षांतील हा फरक आहे.
प्रदेशाध्यक्षांनी गेल्या दौऱ्याच्या वेळी कोणी काय सांगितले होते, याच्या नोंदी काढल्या. त्यामुळे अनेकांची बोलती बंद झाली. भाजपमधून आलेल्या आमदार एकनाथ खडसेंनी संघटन बांधणी कशा पद्धतीने केली पाहिजे, याचे धडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आचरणात किती जण आणतील ? याचे उत्तर येत्या काही दिवसांत दिसेल. पक्ष टिकवायचा असेल, तर कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. आजची पिढी उद्या बाजूला झाल्यावर त्यांची जागा घेणारा दुसरा लागेल. संधी मिळते; मात्र ती घेणारा असला पाहिजे. अन्यथा ‘राष्ट्रवादी’ आणि ‘काँग्रेस’ दोघेही एकाच रांगेतील पक्ष होतील.