सेनेतील अंतर्गत वादात राष्ट्रवादीची उडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:17+5:302021-07-05T04:12:17+5:30

वार्तापत्र- सुशील देवकर सेनेतील जिल्हाध्यक्ष निवडीत अंतर्गत कुरघोडीचे राजकारण झाल्याची चर्चा सुरू असतानाच पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्याला ...

NCP jumps into internal dispute in the army ... | सेनेतील अंतर्गत वादात राष्ट्रवादीची उडी...

सेनेतील अंतर्गत वादात राष्ट्रवादीची उडी...

Next

वार्तापत्र- सुशील देवकर

सेनेतील जिल्हाध्यक्ष निवडीत अंतर्गत कुरघोडीचे राजकारण झाल्याची चर्चा सुरू असतानाच पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्याला पक्षात डावलले जात असल्याची व निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याची जाहीर टीका करून सेनेतील अंतर्गत वादाला जाहीर वादाचे स्वरूप दिले आहे. त्याच संधीचा लाभ घेत राष्ट्रवादीचे पारोळ्यातील माजी आमदार व आमदार चिमणराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी डॉ.सतीश पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांना त्यांच्या मुलाला जिल्हाध्यक्ष करायचे होते. तसेच त्यांची भाजपात प्रवेशाची तयारी सुरू असल्यानेच ते आरोप करीत असल्याचा आरोप करीत खळबळ तर उडवून दिलीच आहे. त्यासोबतच सेनेच्या अंतर्गत वादावर भाष्य करीत नव्या वादालाही तोंड फोडले आहे.

युती शासनाच्या काळात लहान भाऊ म्हणून वावरण्याची वेळ आल्याने सत्तेत डावलल्या गेलेल्या शिवसेनेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तेवर येण्याची संधी मिळाली. मात्र जिल्ह्यातील सेनेचे मंत्री, आमदार व पदाधिकारी यांना ही सत्ता पेलवत नाहीये की काय? असे चित्र सध्या दिसत आहे. सेनेत अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला असल्याचे जाहीरपणे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या सेनेतील जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या करताना सोयीस्करपणे कुरघोड्या करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात जि.प. सदस्य हर्षल माने यांना जिल्हा प्रमुखपद देऊन आमदार चिमणराव पाटील यांना शह देण्याचा प्रकार झाल्याची चर्चा होती. मात्र आमदार चिमणराव पाटील यांनीच स्वत: सेनेत आपल्याला डावलले जात असल्याची जाहीर टीका केल्याने या अंतर्गत वादाला अखेर तोंड फुटले आहे. सेनेत कुठलाही निर्णय घेताना विचारात घेतले जात नसून निधी वाटपातही डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचा रोख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरच आहे. मात्र या वादात आमदार चिमणराव पाटील यांचे विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी उडी घेत आमदार चिमणराव पाटील यांना भाजपात जायचे असल्यानेच ते आरोप करून निमित्त करीत असल्याचा आरोप करीत नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनीच २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला नसता, तो घडविला गेल्याचा आरोप केल्याने त्यास उत्तर दिल्याचा दावा केला आहे.

वास्तविक राष्ट्रवादीतच अनेक गट-तट आहेत. त्यांना आवर कसा घालायचा हे स्वत: जिल्हाध्यक्ष असतानाही शक्य न झालेल्या आमदार डॉ.सतीश पाटील यांनी सेनेतील अंतर्गत वादावर भाष्य केल्याने येत्या काही दिवसात सेना-राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसण्याची शक्यता आहे.

Web Title: NCP jumps into internal dispute in the army ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.