अजित पवारांशी एकनिष्ठ... अनिल पाटलांच्या वाट्याला मंत्रिपद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2023 04:17 PM2023-07-02T16:17:27+5:302023-07-02T16:19:23+5:30
जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तिसरं मंत्रिपद
प्रशांत भदाणे, जळगाव: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडलाय. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा एक गट सत्तेत सामील झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदासंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश आहे.
अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार म्हणून अनिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. पूर्वी भाजपमध्ये असणारे अनिल पाटील हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. सुरुवातीपासूनच ते अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये राज्याच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट नॉटरिचेबल झाला होता. त्यावेळेस पहाटेच्या शपथविधी वेळी अनिल पाटील हे अजित पवारांसोबतच होते. आता पुन्हा एकदा अजित पवार समर्थकांचा गट सत्तेत सहभागी झाला असून, आमदार अनिल पाटील हे अजित पवारांसोबतच आहेत. आता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तिसरं मंत्रिपद आलं आहे. अनिल पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहे अनिल पाटील?
अनिल पाटलांनी भाजपसोबत राजकारणाची सुरुवात केली
2014 मध्ये अमळनेर विधानसभा मतदासंघातून भाजपचे उमेदवार असताना पराभूत
त्यानंतर 2014 मध्येच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला
2019 मध्ये अमळनेर विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले
2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद
आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री
अनिल पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 10 वर्षे सभापती
जळगाव जिल्हा परिषदेचे 10 वर्षे सदस्य
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 15 वर्षांपासून संचालक
जळगाव जिल्हा दूध संघात विद्यमान संचालक