एकनाथ खडसे आमदार होणार?; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:48 PM2022-06-07T13:48:21+5:302022-06-07T13:58:13+5:30
दोन वर्षांपूर्वी खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत भाजपला मोठा दणका दिला होता.
- प्रशांत भदाणे
जळगाव- गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करणे आणि विरोधीपक्ष भाजपला नामोहरम करण्यासाठी शरद पवारांची ही खेळी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना बेरजेचं राजकारण चांगलं जमतं, असं म्हटलं जातं. दोन वर्षांपूर्वी खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत भाजपला मोठा दणका दिला होता. पण त्यानंतरही भाजपला पूर्णपणे शह देण्यात पवारांना यश आलं नव्हतं. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर, आजारपण आणि ईडीची चौकशी या दोन कारणांमुळे पक्षात फारसे सक्रिय होऊ शकले नव्हते. खडसे ईडीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे त्यांच्या बाजूने उभी राहू शकली नव्हती. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते विधानपरिषदमार्गे आमदार होतील, पुढे मंत्रीपद मिळवतील, असा आडाखा बांधला जात होता.
राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश करून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले होते. पण भाजपच्या खेळीमुळे ते शक्य झालं नव्हतं. भाजपमुळेच खडसेंची आमदारकी लांबणीवर पडली होती. आता रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागांमध्ये खडसेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला खानदेशातून एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळालाय. त्यामुळे या प्रदेशात पक्ष विस्तार करण्यास राष्ट्रवादीला संधी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने या प्रदेशातील प्रभाव वाढवणं राष्ट्रवादीला सोपं जाईल. या भागातील भाजपच्या गिरीश महाजनांसमोर खडसे समर्थकांचं आव्हान उभं करता येईल, असाही शरद पवारांचा डाव असू शकतो.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने बड्या नेत्यांना लक्ष केलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख त्या पाठोपाठ नवाब मलिक यांनाही ईडीनं दणका दिला. दुसरीकडे शिवसेनाही हाच त्रास भोगतेय... याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना आमदारकी देईल आणि पुढे पक्षाच्या कोट्यातून थेट गृहमंत्री करू शकते, असाही अंदाज आहे. कारण एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम केल्यानंतर ते सतत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष करत असतात. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचे कारनामे खडसेंना माहिती असल्याचा फायदा राष्ट्रवादी करून घेऊ शकते, असंही बोललं जातंय. राज्याच्या राजकारणात पुढं नेमकं काय घडतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.