जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:00 PM2021-12-03T16:00:12+5:302021-12-03T16:02:09+5:30
गुलाबराव देवकरांनी याआधी बँकेत उपाध्यक्षपद भुषविले होते. आता पहिल्यांदाच त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
जळगाव- जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे (Shyamkant Sonawane) यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत असताना अध्यक्ष - उपाध्यक्ष पदावरून शेवटपर्यंत नाव निश्चित झाले नव्हते. शुक्रवारी सकाळी जिल्हा बँकेत अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवड प्रक्रिया पार पडली. या निवडप्रक्रियेआधी अध्यक्षांच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, गुलाबराव देवकर, संचालक ॲड.रविंद्र पाटील, ॲड.रोहिणी खडसे, संजय पवार, जयश्री महाजन यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अध्यक्षपदी गुलाबराव देवकर व उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित केले. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुलाबराव देवकरांनी याआधी बँकेत उपाध्यक्षपद भुषविले होते. आता पहिल्यांदाच त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.