राष्ट्रवादीकडून आयुक्तांना 'रस्त्यांच्या दुर्दशे'ची फोटोफ्रेम भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:55+5:302021-07-29T04:17:55+5:30
गांधीगिरी : मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवली फ्रेम फोटो - २९ सीटीआर २८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत, भुयारी ...
गांधीगिरी : मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवली फ्रेम
फोटो - २९ सीटीआर २८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत, भुयारी गटारींच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था बनली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांना भेटून, शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच खड्डे व चिखलयुक्त रस्त्यांच्या फोटोची एक फ्रेम त्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आयुक्तांनी ही फ्रेम नाकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क मनपाच्या प्रवेशद्वारासमोर ती फ्रेम ठेवण्यात आली.
गेल्या एक ते दीड वर्षापासून अमृत योजनेचे काम जळगाव शहरात सुरू आहे. योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठी मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळांमध्ये खड्डे खोदण्यात आले होते. नंतर त्या रस्त्यांची थातुर-मातुर दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान, आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर संपूर्ण रस्ते चिखलमय होत आहेत. एवढेच नव्हे, तर दुचाकी घसरून अपघात होत असून, चालणे सुध्दा कठीण बनले आहे. ही स्थिती आयुक्तांसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लांडवंजारी व सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनात गांधीगिरी करीत आंदोलन केले. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करीत आयुक्तांना चिखलयुक्त रस्त्यांची फोटोफ्रेम देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, आयुक्तांनी फ्रेम स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर थेट ती फ्रेम मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवण्यात आली.
९ कोटी रुपये कुणाच्या खात्यात गेले...
रस्त्यांच्या कामांसाठी मनपाला ९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, ही रक्कम कुणाच्या खिशात गेली, असाही जाब राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना विचारला. त्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.