प्रमाणाबाहेर गर्दी असल्याने मनपाकडून आठ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:13+5:302021-04-10T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने शहरात लागू केलेल्या निर्बंधांबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने शहरात लागू केलेल्या निर्बंधांबाबत शहरातील नागरिक व दुकानदार अजूनही गांभीर्याने या नियमांकडे लक्ष देत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी अनेक दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर नागरिकांची गर्दी झाल्याने मनपा प्रशासनाने शहरातील आठ दुकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानाला पाच हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कडक उपायोजना केल्या जात असल्या तरी शहरातील दुकानदारांकडून या उपाययोजनांना केराची टोपली दाखवली जात आहे. मनपा प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली जात असली तरीही दुकानदार नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाकडून शहरातील विविध भागांमधील आठ दुकाने सील करण्यात आली आहेत. यामध्ये गणेश कॉलनी चौक परिसरातील तीन, केळकर मार्केटमधील तीन, बोहरा गल्लीतील एक व स्वतंत्र चौकातील एका दुकानाचा समावेश आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने या दुकानदारांना याआधीदेखील नोटीस बजावली होती. मात्र महापालिकेने बजावलेल्या नोटीसनंतरदेखील संबंधित दुकानदारांनी मनपाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, महापालिकेने शुक्रवारी मास्क लावणाऱ्या दहा जणांवरदेखील कारवाई केली आहे.
अर्धे शटर बंद करून केला जातोय व्यवसाय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरात अनेक दुकाने अर्धे शटर लावून व्यवसाय करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील घाणेकर चौक, फुले मार्केट परिसर या भागात अनेक दुकानदारांनी अर्धे शटर लावून व्यवसाय केल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे या वेळी दुकानात पंधराहून अधिक ग्राहक आढळून आले. एकीकडे प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी कडक उपाययोजना केला जात असताना दुसरीकडे मात्र अनेक दुकानदारांकडून प्रशासनाच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम सुरू आहे. यासह शहरातील अनेक भागांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडूनदेखील नियमांकडे दुर्लक्ष करून व्यवसाय केला जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक विक्रेत्यांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसूल
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्लास्टिक तसेच थर्माकोल उत्पादनावर बंदी आहे. मात्र शहरात अनेक विक्रेत्यांकडून अजूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या आठवडाभरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारीदेखील शहरातील बॉम्बे बेकरीवर कारवाई करण्यात आली आहे. आठवडाभरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने २० विक्रेत्यांवर कारवाई करून ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.