सहकारातील गद्दारांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे ‘गोलगोल’ उत्तर
By अमित महाबळ | Published: March 28, 2023 03:59 PM2023-03-28T15:59:43+5:302023-03-28T15:59:51+5:30
जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत. याची नोंद घेतली जाईल. कारवाई काय होणार हे मात्र, त्यांनी सांगितले नाही.
अमित महाबळ
जळगाव : सहकार क्षेत्रातील दूध संघ, जिल्हा बँक यांच्या पक्षीय निवडणुका नसतात. परंतु यामध्ये पक्षाची अप्रतिष्ठा झाली, जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत याची नोंद घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते जळगावात बोलत होते.
जिल्हा बँक निवडणुकीत संजय पवार यांनी पक्षाविरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांचा सूर असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, की संजय पवार यांच्या बाबतीत वरिष्ठांना कळवले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर पक्ष अध्यक्ष म्हणून मी बोलणे उचित होणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या मताला महत्व द्यावे लागेल. दूध संघ, जिल्हा बँक यांच्या पक्षीय निवडणुका नसतात. परंतु यामध्ये पक्षाची अप्रतिष्ठा झाली आहे. जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत. याची नोंद घेतली जाईल. कारवाई काय होणार हे मात्र, त्यांनी सांगितले नाही.
हा भाजपाचा पराभव
जिल्हा बँकेत भाजपाला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. हा भाजपाचा पराभव आहे. आमदार एकनाथ खडसेंना पक्षात घेतल्याने जिल्ह्यात पक्ष बळकट झाला आहे. याचे सकारात्मक परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खान्देशात दिसून येतील, असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजपाची लोकप्रियता घटली
राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी कोणाला जनतेचा पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आले आहे. शिंदे गट व भाजपा एकत्र आल्याने त्यांची लोकप्रियता कमी झाली आहेच पण भाजपाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्य चालवत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुखवटा आहेत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.