राष्ट्रवादी काँग्रेसची युवा जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:58 PM2018-10-17T22:58:10+5:302018-10-17T22:58:36+5:30
चंद्रशेखर जोशी एकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा ...
चंद्रशेखर जोशी
एकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा विधानसभा मतदार संघातील डॉ. सतीश पाटील हे विजयी झाले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्राबल्यही कमी झाले तर काही ठिकाणची सत्ता या पक्षाला गमवावी लागली. त्यानंतर चार वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कृषि उत्पन्न बाजार समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही हा पक्ष फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्यामुळे काहीशी मरगळ गत काळात पक्षात होती. जिल्ह्यातील दिग्गज नेते या पक्षाकडे आहेत. माजी मंत्री, विधासभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन यासह काही माजी आमदार व माजी खासदार या पक्षात आहेत. असे असताना सातत्याने पदरी पडलेले अपयश पक्षाच्या नेत्यांनाही धक्कादायक ठरले आहेत. गत तीन-साडेतीन वर्षात काही मोजकी आंदोलने वगळता पक्षाकडून फारशी आक्रमक आंदोलने सरकार विरोधात झाली नाही, काहीशी मरगळ दिसून आली. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यात काही संघटनात्मक बदल पक्षश्रेष्ठींनी केले. यात जिल्हाध्यक्षपदीची जबाबदारीअॅड. रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. महानगरातील अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेची वाट धरली. या पदावर गेल्या आठवड्यात पक्षातील एक पदाधिकारी नामदेव चौधरी यांच्यावर महानगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यातच या आठवड्याच्या प्रारंभी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातील युवा शक्तीला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविले गेले. महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद, महिला मेळावे, कार्यकर्त्यांशी संवाद असे कार्यक्रम सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले. या काळात जिल्ह्यातील काही प्रलंबित विषयांना त्यांनी हात घालून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती, हमी भाव, भारनियमन, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरची भाववाढ असे महिलांशी संबंधीत विषय महिलांशी साधलेल्या संवादातून मांडले. थेट महिलांशी प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांनी संवाद साधला. पक्षाचा कार्यकर्ता आगामी निवडणुकांसाठी तयार व्हावा असे त्यांचे प्रयत्न दिसून आले. येता काळ निवडणुकांचा असल्यामुळे त्यांनी दिलेल्या हाकेला कितपत साथ मिळते हे येता काळच ठरवेल.