स्वाभिमान सभेमुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ‘नवनिर्माण’
By विलास बारी | Published: September 7, 2023 07:40 PM2023-09-07T19:40:59+5:302023-09-07T19:41:25+5:30
चोपडा, अमळनेर व जळगाव शहरसाठी चाचपणी : पक्षसंघटना सोबत असल्याचा मिळाला संदेश
जळगाव : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे नेते व खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिली स्वाभिमान सभा झाली. या सभेमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला असताना चोपडा, अमळनेर व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अमळनेर येथील आमदार अनिल पाटील हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. मात्र, पक्ष संघटना ही मोठ्या प्रमाणात खासदार शरद पवार यांच्या बाजूने राहिली. पक्ष संघटना आणि आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अमळनेर, चोपडा व जळगाव शहरात चाचपणी
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू केली आहे. जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चाेपडा, जामनेर या भागात पक्षाचे संघटन चांगले आहे. गेल्या वेळी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने लढविली होती. फारशी तयारी नसताना उमेदवार अभिषेक पाटील यांनी चांगली लढत दिली होती. जळगाव शहरसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या महापाैर जयश्री महाजन यादेखील इच्छुक आहेत. मात्र, ही जागा ठाकरे गटाला जाते की राष्ट्रवादीला याबाबत अजून अनिश्चितता आहे. त्यातच खासदार शरद पवार यांची महापौर जयश्री महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि खडसेंना बळ
या सभेच्या निमित्ताने शरद पवार यांनी जळगाव ग्रामीणसाठी इच्छुक उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना बळ दिले आहे. देवकर यांनी सभेचे नियोजन व्यवस्थित केले. राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसे हे आक्रमक नेते असल्याने पक्षाने त्यांच्यासह त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी दिल्याचे या दौऱ्यांच्या निमित्ताने दिसून येत आहे.
विधानसभेसोबत लोकसभेवर डोळा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात खडसे यांच्या नेतृत्वात भाजपने खासदारकीच्या जागा विजयी केल्याचा संदर्भ देत आता राष्ट्रवादीच्या दोन्ही जागांची जबाबदारी खडसेंकडे सोपविण्याचे संकेत दिले आहे.
राष्ट्रवादी दिसली एकसंघ
या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पहिल्यांदा एकसंघ दिसली. सभास्थळी तालुक्यानुसार बैठक व्यवस्था तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्याने व नेत्यांनी यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. जळगाव ग्रामीण व चोपडा या भागातून सर्वाधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती सभेला होती.