ताडे तलावाचा विकास करण्याची गरज
By admin | Published: January 13, 2017 12:33 AM2017-01-13T00:33:28+5:302017-01-13T00:33:28+5:30
अमळनेर : तलावात अनेक वर्षापासून साचलेले आहे अस्वच्छ पाणी, पर्यटनस्थळ म्हणून चालना द्यावी
अमळनेर : शहरातील शनिपेठ भागातील ताडेपुरा तलावात अनेक वर्षापासून अस्वच्छ पाणी साचलेले आहे. यामुळे हा तलाव डास उत्पत्ती केंद्र झाला आहे. परिणामी ताडेपुरा आणि शनिपेठ परिसरात तापाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या तलावाची स्वच्छता करून याठिकाणी पिकनिक पॉईंट विकसित करण्याची मागणी होत आहे.
पैलाड भागात शनीपेठ परिसरात मोठा एका खडय़ात पाणी साचलेले आहे. यालाच ताडेपुरा तलाव म्हणतात. दुष्काळीस्थितीतदेखील या तलावाचे पाणी आटत नाही. पावसाळ्यात पारोळा आणि हेडावे रस्त्याकडून पाण्याची मोठी अवाक असल्याने हा तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहत असतो.
या तलावात अनेक प्रकारची घाण टाकली जाते. गणपती विसर्जन करून निर्माल्यदेखील येथे टाकले जाते. ते पाण्यात कुजून त्याची दरुगधी परिसरात पसरते. या तलाव परिसरात रहिवास आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
या तलावाची नगरपरिषदेकडून अनेक वर्षापासून स्वच्छताच झालेली नाही. केवळ गणपती उत्सवात नागरिकांना गणरायाचं विसर्जन करता यावे यासाठी याठिकाणी दिवे लावले जातात. त्याव्यतिरिक्त नगरपरिषदेचा स्वच्छता कर्मचारी येथे दिसत नाही.
या तलावाच्या आजूबाजूला वीट भट्टय़ा आहेत. तलावाचे पाणी विटा बनवण्यासाठी वापरले जाते. मात्र वीट भट्टय़ांमधून निघणा:या धुराने परिसरात हवेचेदेखील प्रदूषण होते. डास आणि हवेचे प्रदूषण यामुळे परिसर पूर्णपणे मानवी आरोग्यास बाधक ठरू पाहत आहे.
पिकनिक पॉईंट म्हणून
विकास व्हावा
ताडेपुरा तलावाच्या काठावर शिरपूरच्या धर्तीवर चौपाटी विकसित केल्यास शहरवासीयांसाठी तो एक पिकनिक पॉईंट ठरू शकतो. त्यासाठी नगरपरिषदेने तलावाची नियमित स्वच्छता केल्यास आणि तलाव काठचे अतिक्रमण काढून तिथे दिवे लावून, बोटिंगची व्यवस्था झाल्यास या भागाचा कायापालट होऊ शकतो. तलावाच्या शेजारी मंगळग्रह मंदिर आहे. तिथे परराज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. ताडेपुरा तलाव विकसित झाल्यास शहर सौंदर्यात भर पडणार आहे. त्यातून नगरपरिषदेचे उत्पन्नदेखील वाढणार आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सदर तलावाचा विकास आराखडा तयार केला होता. त्यासाठी निधीची मागणीदेखील केली होती. आता नगर परिषदेत त्यांचीच सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी शहराला दाखवलेले हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, प्रतापशेठजींची उद्योगभूमी व साने गुरुजींची कर्मभूमी व मंगळदेव ग्रह मंदिरामुळे अमळनेरचा लौकिक सर्वत्र वाढलेला आहे.
या ताडे तलावाचा विकास करून त्याचा शिरपूर पॅटर्नप्रमाणे पिकनिक स्पॉट म्हणून विकास केल्यास, शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. यासाठी पालिकेने प्रय} करण्याची आवश्यकता आहे.