आधुनिक वैद्यकशास्त्र व प्राचीन आयुर्वेदशास्त्राची सांगड घालून संशोधनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:09 PM2020-12-17T20:09:55+5:302020-12-17T20:10:04+5:30
पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन : यशोवल्लभ व्याख्यानमाला
जळगाव : आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्राचिन आयुर्वेदशास्त्र यांची सांगड घालून सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुरुवारी हृदयशल्य चिकित्सक पद्मविभूषण डॉ. एम.एस.वलियाथन यांनी ऑनलाईन व्याख्यानमालेत केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी.पाटील महाविद्यालय,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने यशोवल्लभ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.वलियाथन यांनी सायंटिफिक रिसर्च बेस ऑन आयुर्वेदिक क्युज या विषयावर सविस्तर मांडणी करतांना आयुर्वेदाच्या प्राचीन पंरपरेचा आढावा घेतला. आयुर्वेदाला मोठी प्राचीन परंपरा आहे. अथर्व वेदात आयुर्वेद शास्त्राचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे अथर्व वेदाला आयुर्वेदाचे उपवेद मानले जाते. चरकसंहिता आणि सुश्रृतसंहिता यामध्ये आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीविषयी सविस्तर माहिती आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचा विस्तार झपाट्याने
परदेशातील लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटत असल्यामुळे ते अभ्यास करू लागले आहेत. आपल्याकडे केरळात ही समृध्द परंपरा जोपासली गेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचा विस्तार झपाट्याने होत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील विस्तारले आहे. तरी देखील आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. ॲलोपॅथीचे काही तज्ज्ञ आयुर्वेदाकडे वळाले आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या काही मर्यादा असल्यातरी आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्र यांची सांगड घालून निराकारण केले जावू शकते,असेही डॉ. वलियाथन यांनी सांगितले. या व्याख्यान मालेचे प्रा. राम भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी आभार मानले. डॉ. वलियाथन यांच्या व्याख्यानाचा ७०० जणांनी यु ट्यूब द्वारे लाभ घेतला.