‘नीरज आहे खरा चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:35+5:302021-08-29T04:18:35+5:30
नवी दिल्ली : नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत पहिल्या थ्रोच्या वेळी माझा भाला ...
नवी दिल्ली : नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत पहिल्या थ्रोच्या वेळी माझा भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे होता. असे वक्तव्य केले. त्यामुळे मोठा वाद निर्माण होत होता. त्याचवेळी नीरजने पुढे येत तुमच्या खराब अजेंड्यासाठी मला वापरू नका, असे वक्तव्य करत अर्शद नदीमचा बचाव केला. त्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि क्रीडाक्षेत्रातून नीरज याचे कौतुक होत आहे.
पाकिस्तानातील एक क्रीडा पत्रकार अब्दुल गफ्फार यांनी ट्विट केले की, ‘नीरज तू प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओसाठी तुझे आभार, तू खरा चॅम्पियन आहे, हेच कारण आहे की, अर्शद नदीम तुझा एवढा सन्मान करतो.’
पाकिस्तानातील एक पत्रकार शिराज हुसैन यांनी अर्शद आणि नीरज यांचा एकत्रित फोटो पोस्ट करून प्रेम आणि आदर, असे कॅप्शन दिले आहे.
अर्शदनेही सोडले मौन
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने या वादावर मौन सोडले आहे. त्याने पुष्टी केली की, ऑलिम्पिक दरम्यान मी नीरज याचा भाला घेतला होता. असू शकते की, ‘सरावादरम्यान तो त्याचा आवडता भाला असेल आणि त्यासाठीच त्याने तो माझ्याकडून घेतला. स्पर्धेदरम्यान ही बाब खूपच सामान्य आहे. कोणताही खेळाडू या स्पर्धेदरम्यान स्वत:चे साहित्य सोबत नेत नाही. सर्व साहित्य आयोजक उपलब्ध करून देतात. फायनल राउंडमध्ये सर्व भाले एकत्रच ठेवले होते. कोणताही ॲथलिट एक भाला घेऊ शकतो. मला माहीत नव्हते की माझ्याकडे जो भाला आहे त्याचा वापर नीरजने केला होता किंवा नाही. तो त्याचा आवडता भाला असेलही मात्र मी हे जाणूनबुजून केले नाही. मी असे का करेल आणि जरी केले तरी तो एक योगायोग होता.’