शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 09:26 PM2019-09-28T21:26:38+5:302019-09-28T21:27:03+5:30
विश्लेषण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : स्वच्छता मोहिम राबवून विविध संदेश देणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मात्र शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शासकीय कार्यालयांचे छत तसेच भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगविली असून दहा वर्षांपासून साफसफाईदेखील झालेली नाही. अखेर १५ आॅक्टोबर कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सा.बां. विभागाला लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.
शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगण्यासह भींत तसेच छतांवर सुरुवातीला गवत उगवून नंतर ते मोठे झाले आहे. दहा वर्षात त्याची साफसफाई न झाल्याने त्या ठिकाणी झाडेच झाले आहेत. त्यामुळे पाणी झिरपण्यासह भिंतींना तडेदेखील जात आहे. यासाठी शासकीय कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना या पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिल्या होत्या. तरीदेखील ते काढले न गेल्याने जिल्हाधिकाºयांनी सा.बां. विभागाला पत्र देऊन १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कार्यालयांवर उगविलेले झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच शहरात एकीकडे प्लॅस्टिकमुक्त जळगाव संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला असताना कार्यालयांमध्ये कोठे गवत उगविलेले तर कोठे अस्वच्छता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी श्रमदान करीत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये बगीचासह आजूबाजूचे गवत काढले.
अशीच मोहीम प्रत्येक कार्यालयात दक्षता घेतल्यास अस्वच्छता दूर होण्यास वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की.