हक्काच्या मालमत्तांकडे दुर्लक्ष अन् आर्थिक परिस्थितीचे रडगाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:36+5:302021-07-24T04:12:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नागरिकांना सुविधा देण्याची वेळ आली की मनपाकडून नेहमी आर्थिक परिस्थितीचे कारण देत वेळ मारून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नागरिकांना सुविधा देण्याची वेळ आली की मनपाकडून नेहमी आर्थिक परिस्थितीचे कारण देत वेळ मारून नेला जात असतो. मात्र, दुसरीकडे विविध मालमत्तांच्या पोटी मनपाची तब्बल ४०० कोटींची वसुली थकीत आहे. १ हजार कोटींच्या मालमत्ता या अनेक वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. मात्र, नियोजनशून्यता आणि उदासीन या हक्काच्या उत्पन्नांकडे दुर्लक्ष होत आहे.
गाळेधारकांकडे मनपाची तब्बल २५० कोटींपर्यंतची वसुली थकीत आहे, तर दुसरीकडे हेच गाळे ताब्यात घेऊन पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविली तर मनपाला त्यातून सुमारे ८०० ते १ हजार कोटींपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मनपा प्रशासन यावर निर्णय घेण्यात अपुरी पडत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे मनपा प्रशासन निर्णय घेण्यात हतबल दिसून येत आहे.
या मालमत्तांकडे मनपाचे दुर्लक्ष
मालमत्ता व त्यातून होणारी वसुली
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे वसुली - १५० कोटी अंदाजे
ट्रान्सपोर्ट नगर - २० कोटी
ओपन स्पेस - १ हजार कोटी
घरकुल योजनेत रिकामे पडलेली घरे - ३० ते ४० कोटी
भंगार बाजार - १० कोटी
घरकुलधारकांकडे थकीत सेवा शुल्काची रक्कम - १६ कोटी
खुला भूखंड कर - १५ कोटी
३९७ संस्थांना दिलेल्या जागांचा व्यावसायिक वापर
तत्कालीन नगरपालिका व महापालिकेने शहरातील मनपा मालकीच्या अनेक जागा या शहरातील सेवाभावी संस्थांना दिल्या आहेत. या जागांची किंमत आजच्या स्थितीत १ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. शहरातील ३९७ संस्थांना या जागा देण्यात आल्या आहेत. या जागा या संस्थांना सेवाभावी कामासाठी देण्यात आल्या असल्या तरी अनेक संस्था या जागांचा व्यावसायिक वापर करत असून, मनपाने या जागा ताब्यात घेण्याबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
सद्यस्थिती
१. महापालिकेचे एकूण वार्षिक वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी इतके आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४५ कोटींचीच वसुली होत असते. मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईबाबत किंवा थकीत रक्कम वसूल करण्याबाबत देखील मनपाकडे कोणतेही नियोजन नाही.
२. खुला भूखंड कर वसुलीसाठी मनपाचे अद्याप धोरण निश्चित नाही. मनपाला शहरातील खुले भूखंड कोणाच्या नावावर आहेत, याची देखील माहिती नाही.
३. गाळेधारकांबाबत मनपाने धोरण निश्चित केले आहे. मात्र, कारवाई केली जात नाही. अनेकवेळा गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी नोटिसा दिल्या गेल्या मात्र गाळेधारकांनी थकीत रक्कम भरलेली नाही.
४. ट्रान्सपोर्ट नगरबाबत मनपा प्रशासनाकडून वकिलांचा सल्ला घेतला जात आहे, तर भंगार बाजारबाबत देखील ठराव करून, अद्याप ताब्यात घेण्याबाबत निर्णय सुरू आहे.
कोट..
मनपा प्रशासनाच्या हक्काच्या जागा ताब्यात घेण्याबाबत सर्वंकष निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच यामध्ये काही अडचणी, तांत्रिक व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन याबाबत पुढील प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ज्या जागा पडल्या आहेत किंवा वसुली ज्यांच्याकडे रखडली आहे. ही वसुली व या जागांबाबत निर्णय घेतला तर मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मात्र, यामधील अडचणी देखील समजून घ्याव्या लागणार आहेत.
-जयश्री महाजन, महापौर