कोरोना मृतांवरील अंत्यसंस्कारात होतोय हलगर्जीपणा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:03+5:302021-04-05T04:15:03+5:30
पीपीई कीट फेकले जाताय उघड्यावर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी अंत्यसंस्कार करणारा मनपाने नियुक्त केलेले ...
पीपीई कीट फेकले जाताय उघड्यावर
शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी अंत्यसंस्कार करणारा मनपाने नियुक्त केलेले कर्मचारी व मृताचे नातलग पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार उरकतात. मात्र त्यानंतर हे पीपीई किट उघड्यावरच टाकून दिले जातात. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजनांची गरज आहे.
स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरण
स्मशानभूमीत मृतांवर पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार केले जातात. त्यावेळी इतर नातलग दूरवर ओट्यांजवळ थांबतात. त्यामुळे या संपूर्ण स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम मनपाकडून नियमितपणे केले जाते. मात्र यात खंड पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कोरोनाने मृत्यू झालेल्यांमुळे या परिसरात कोरोना संक्रमणाची अधिक शक्यता असते.
नियमित सफाई होणे गरजेचे
स्मशानभूमीत पीपीई किट व इतर साहित्य, कपडे टाकण्यासाठी कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. मात्र ती नियमितपणे रिकामी करणे गरजेचे आहे. अनेकदा ही कचराकुंडी भरून ओसंडून वाहते तरीही रिकामी केली जात नसल्याचे चित्र आहे.
अंत्यसंस्कार करणाऱ्यांचीही नियमित तपासणी आवश्यक
नेरीनाका स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी कोणी पुढे आले नाही तर अंत्यसंस्काराची व्यवस्था मनपाने केली असून, त्यासाठी कामगारांची नियुक्ती केली आहे. मात्र या कामगारांचीही नियिमतपणे आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांना संसर्ग होणार नाही, यादृष्टीने साहित्य पुरवून काळजी घेणे आवश्यक आहे.
नातेवाईकही फिरकेना
कोरोनाच्या दहशतीने अनेकदा तर कोरोना मृताच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे नातलगही फिरकत नाही. तेव्हा मनपाने त्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश कोरोना मृतांचे जवळचे नातलग, विशेषत: मुलगा, मुलगी, पत्नी आदी स्वत: स्मशानभूमीत येऊन अंत्यविधी पार पाडतात. त्यांनाही संसर्ग होणार नाही, यादृष्टीने या स्मशानभूमीत उपाययोजना करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.