नेहते ग्रा. पं. कार्यालयाला सरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:31 AM2018-08-17T02:31:27+5:302018-08-17T02:34:53+5:30
रावेर तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवकांची सातत्याने गैरहजेरी त्यात सदर ग्रामसेवक स्वातंत्र्य दिनालादेखील गैरहजर राहिल्याचा राग आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुलूप ठोकल्याची घटना घडली.
रावेर जि. जळगाव : तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवक मराठे हे सातत्याने गैरहजर राहत असून ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक देत मनमानी करीत असल्यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तसेच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळ्याला ग्रामसेवक अनुपस्थित राहिल्याचा राग आल्याने सरपंच महेंद्र पाटीलसह संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना बुधवारी घडली.
पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एच. एन. तडवी यांच्याकडे १० रोजी दिलेल्या तक्रारी निवेदनात ग्रामसेवक हे तीन गावांचा पदभार असल्याचे सांगून सतत गैरहजर राहत असल्याचे नमूद केले असून विकास कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. शतकोटी वृक्ष लागवड, भारत स्वच्छता अभियान तथा ग्रा. प.ं ची २० लाख रुपयांची थकीत करवसुलीकडे दुर्लक्ष होत असून यासह विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र गटविकास अधिकारी यांनी दखल न घेतल्याने व ग्रामसेवक हे स्वातंत्र्य दिनाला ही अनुपस्थित राहिल्याचा राग आल्याने सरपंच महेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्यदिनी कुलूप ठोकले. यावेळी त्यांच्यासोबत महेंद्र कोळी, रवींद्र वैदकर, पंडीत कोळी, गोकुळ महाजन, प्रल्हाद काकडे, गणेश वाघ, सुधाकर वाघ, मनोज कचरे, विश्वास काकडे आदी ग्रा पं सदस्य व ग्रामस्थांचा समावेश होता.