ना 'मान' ना 'धन'...प्राध्यापकाला विकावे लागतेय चिकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:00+5:302021-02-15T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतोय...२०१८ मध्ये सेट उत्तीर्ण झालो, दोन महिन्यात पीएच.डी. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतोय...२०१८ मध्ये सेट उत्तीर्ण झालो, दोन महिन्यात पीएच.डी. पूर्ण होईल, मात्र, प्राध्यापक भरती बंद असणे व कामाचा मोबदला न मिळणे याबाबींमुळे आर्थिक कोंडीत सापडलोय आणि गेल्या वर्षभरापासून मासे व चिकन विक्री करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढत असल्याची व्यथा प्रा. विनोद नाईक यांनी मांडली आहे. त्यांनी बुधवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांचे दु:ख मांडले.
प्रा. नाईक हे चोपडा तालुक्यातील सुंदरगढी येथील रहिवासी, आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चोपड्यातच त्यांनी एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. २०१० पासून ते विविध महाविद्यालयात तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. तासिका तत्त्वावर कामे करणाऱ्या एकाच महाविद्यालयात काम करावे लागेल आणि त्यांना १८ हजार रुपये मासिक मानधन मिळेल, असा शासन निर्णय असताना आजपर्यंत इतके मानधन मिळाले नाही. अगदी तुटपुंज्या मानधनावर वर्षानुवर्ष कामे केली. त्यात गेल्या कोरोनाच्या काळानंतर मानधनच मिळाले नाही. आर्थिक घडी विस्कटल्याने सकाळी अध्यापन आणि सायंकाळी चिकन विक्री असा दिनक्रम चालवून कुटुंब चालवावे लागत आहे. कुटुंबात आई-वडील, दोन मुले आहेत. कुटुंब पूर्णत: आपल्यावर अवलंबून आहे.
जयंत पाटलांसमोर अश्रू अनावर
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर प्रा.नाईक यांनी सर्व प्राध्यापकांच्या या व्यथा मांडल्या. आदिवासी समाजातील एक व्यक्ती शिक्षण घेऊन पुढारलेल्या समाजासोबत चालू इच्छितो मात्र, लोक स्वीकारत नाही, दोन मिनिटे वेळ देत नाहीत, असा मोठ्याने आवाज दिल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांशी बोलता आले, अन्यथा त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते. त्यांच्याशी बोलताना अखेर अश्रू अनावर झाले, असे प्रा. नाईक यांनी सांगितले.
कोट
स्थानिक भाषा बोलणारा मी आज इंग्लिश बोलू शकतो, शिकवू शकतो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी दहा वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत घेतोय, मात्र, अशा स्थितीत समाज माझा काय आदर्श घेणार आहे. प्राध्यापकांचा आवाज शासनाच्या कानापर्यंत कधी जाईल, त्यांच्या व्यथा शासन कधी समजून घेईल.
- प्रा. विनोद नाईक