‘नेकी की दिवार’ झाली कमाईचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:40+5:302021-01-01T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील जुन्या बी. जे. मार्केट परिसरात वर्षभरापूर्वी माजी नगरसेवकाने ‘नेकी की दिवार’ ही संकल्पना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील जुन्या बी. जे. मार्केट परिसरात वर्षभरापूर्वी माजी नगरसेवकाने ‘नेकी की दिवार’ ही संकल्पना राबविली होती. याठिकाणी कपडे ठेवल्यानंतर ते कपडे गरजू स्वत:हून घेऊन जात होते. हा उपक्रम स्तुत्य असला तरी यामागचा हेतू काही महिन्यानंतर स्पष्ट झाला आहे. हळूहळू ही ‘नेकी की दिवार’ तोडून त्याठिकाणी अवैधपणे दुकाने तयार करून आता ती दुकाने भाड्याने देत संबंधिताने कमाईचे साधन सुरु केले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ही दुकाने सुरु असताना मनपा प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील अनेक भागात वर्षभरापूर्वी ‘नेकी की दिवार’चे फॅड आले होते. हा उपक्रम चांगला होता. मात्र, तो उपक्रम फार जास्त काळ टिकला नाही. शहरातील जवळजवळ सर्वच ‘नेकी की दिवार’ आता बंद झाल्या आहेत. जुन्या बी. जे. मार्केटमधील पोलीस स्थानकाला लागूनही एका माजी नगरसेवकाने हा उपक्रम सुरु केला होता. या उपक्रमाला सुरुवातीला चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर याठिकाणची भिंत तोडून पत्र्याची शेड तयार करून दोन दुकाने तयार करण्यात आली आहेत. ही दोन्ही दुकाने भाड्याने देत संबंधितांकडून ८ हजार रुपये महिना भाडेदेखील वसूल केले जात आहे. विशेष म्हणजे या भागात मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सामान्यांवर कारवाई, पदाधिकाऱ्यांना मात्र अभय
काही दिवसांपूर्वी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ख्वॉजामिया चौक परिसरातील मोकळ्या जागेवर बांधण्यात आलेल्या काही पत्र्याच्या शेड तोडून टाकण्यात आल्या होत्या. मनपा प्रशासनाने केवळ या शेड सर्वसामान्यांच्या होत्या म्हणून त्या तोडण्याची हिंमत दाखवली, तर दुसरीकडे बड्या पदाधिकाऱ्याने अतिक्रमण केले असता, त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.