रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:12 PM2023-01-12T21:12:57+5:302023-01-12T21:13:18+5:30
काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शामकांत सराफ
पाचोरा(जि. जळगाव) : धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने काकूचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर भागात बुधवारी रात्री घडली. काकू व पुतण्याची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.
हनुमान नगर भागातील दादाभाऊ मोरे हे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे परिवारासह गेले होते. ते घरी आल्यावर त्यांचा मुलगा किरण दादाभाऊ सोनार (मोरे) (२७) हा तारखेडा रोडकडे रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. त्याचवेळी रेल्वेचा धक्का लागून तो गाडीखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वेचे लोको पायलट जे.एच. देवरे यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन उपप्रबंधकांना या घटनेची माहिती दिली.
किरणच्या अचानक मृत्यूची घटना कळताच त्याच्या काकू उषाबाई मन्नू सोनार (४०) यांना जोरदार धक्का बसला. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. यानंतर काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हनुमान नगर भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे अपघाताची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.