नेरी येथे ‘पिग्मी’च्या १५ हजार रुपयांवर चोरट्याचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:48 PM2019-03-27T17:48:07+5:302019-03-27T17:48:57+5:30
जामनेर पोलिसात तक्रार
नेरी, ता. जामनेर : येथील जामनेर रोडवरील ज्ञान पार्कमधील रहिवाशी ईश्वर पांडुरंग चौधरी यांच्या घरातून पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांंनी लंपास केली. पतसंस्थेतील ग्राहकांच्या दैनंदिन जमा (पिग्मी) रकमेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने चौधरी यांच्यावर संकट कोसळले आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
ईश्वर चौधरी हे नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री आपल्या घरात झोपलेले असताना घराच्या पुढील खोलीमधील सरकत्या खिडकीच्या काचा सरकवून बंद असलेला मुख्य प्रवेशद्वार आत मधून उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खोलीमध्ये असलेल्या एका बॅगेतील रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. या वेळी इतर सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकले. या प्रकरणी ईश्वर चौधरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
ईश्वर चौधरी हे पहूर येथील एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून गावात काम करतात. मंगळवारी गावाचा नेरी येथील आठवडे बाजार असल्याने त्यांच्याकडे पंधरा हजार रुपये जमा झाले होते. दररोजची जमा झालेली रक्कम ते दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यालयात जाऊन जमा करतात. मात्र हीच रक्कम लंपास झाल्याने ईश्वर चौधरी यांच्या समोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
दीड लाख रुपये वाचले
शनिवार आणि रविवारमुळे पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बंद असल्याने तीन ते चार दिवसांची जवळपास दीड लाख रुपये रक्कम चौधरी यांच्याकडे जमा झाली होती. मात्र रक्कम जास्त असल्याने त्यांनी मंगळवारी पहूर येथील मुख्य कार्यालयात जमा केली. मंगळवारी रात्रीच चोरीची घटना घडल्याने किमान दीड लाख रुपये तरी वाचू शकले. मात्र एका दिवसाचे पंधरा हजार रुपये गमावल्याचे दु:ख असल्याचे चौधरी म्हणाले.