नेरीच्या आरोपी पत्नीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:43 PM2019-03-13T22:43:47+5:302019-03-13T22:43:59+5:30
जामनेर पोलिसांनी घटनेच्या अकराव्या दिवशी अटक केली
नेरी, ता. जामनेर : पतीच्या हत्याकांडातील आरोपी असलेली पत्नी कोमल संदीप पवार (२१) हिला जामनेर पोलिसांनी घटनेच्या अकराव्या दिवशी अटक केली. तिला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीची मानसिक स्थिती पाहता व ती गरोदर असल्याने तिच्या अटकेस विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या ३ रोजी पहाटे ५ ते ६ वाजेच्या सुमारास येथील टोल नाका परिसरातील जामनेर रोडवरील राहत्या घरात संदीप उत्तम पवार (वय-२७) या तरुणाचा त्याची पत्नी कोमल पवार हिने अतिशय निर्दयीपने पेव्हर ब्लॉकच्या (फरशी) सहाय्याने डोके ठेचून खून केला होता. तसेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
कोमलच्या मानसिक स्थितीमुळे व ती सात महिन्यांची गरोदर असल्याने पोलीस तिला अटक करण्यास धजावत नव्हते. त्यातच कोमल हिला जिल्हा रुग्णालयाने पुन्हा उपचारासाठी दाखल करुन घेतल्याने मयत संदीपचे मेहुणे संतोष पाटील यानी जिल्हा रुग्णालयात जावून जाब विचारला होता.
घटनास्थळी पाहणी
न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर आरोपी कोमल हिला घटनास्थळाची पडताळनी करण्यासाठी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेरी येथे आणण्यात आले. घडलेली घटना आरोपीने सांगितली. मात्र पतीचा इतक्या क्रूरपणे खून का केला, हे मात्र अजून गुलदसत्यातच आहे.