नेट सेवा बंद जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:11 PM2019-02-25T22:11:37+5:302019-02-25T22:14:19+5:30
नेट सुविधा बंद असल्याने जिल्हा बँकेच्या कासोदा शाखेचे बँकींग व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : नेट सुविधा बंद असल्याने जिल्हा बँकेच्या कासोदा शाखेचे बँकींग व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
जिल्हा बँकेच्या कासोदा येथील शाखेत भारत दूरसंचार निगमची नेट सुविधा आहे. परंतु २२ फेब्रुवारीपासून या परिसरात कुठे तरी केबल तुटल्याचे कारण सांगून नेट सेवा बंद पडली आहे.
नेट बंद असल्याने या शाखेचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांची पैशांची देवाणघेवाण बंद पडली आहे. सध्या लग्नसराई जोरात आहे. कोणत्याही लहान-मोठ्या कामासाठी बँकेशी व्यवहार करणाऱ्या नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे. या शाखेत कर्मचारी वर्गदेखील अपुरा आहे. त्यात हे नेट संकट. त्यामुळे या शाखेतील पूर्ण व्यवहार बंद पडले आहेत. बँकेतून पैसे मिळत नसल्याने जनतेमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या शाखेत रोज वादविवाद होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या शाखेशी परिसरातील सुमारे १९ गावे जोडले आहेत. किमान ४० हजार लोकांचा या बँकेशी संपर्क असतो. सध्या परिसरात रस्त्यांची व पाईप लाईनसाठी कामे सुरू आहेत. ही सर्व कामे यंत्राद्वारे होत आहेत. यंत्रे जमिनीतील केबल तोडतात, तोडलेली केबल जोडण्यास मोठा विलंब होतो, त्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत. जिल्हा बँक ही मोठी बँक असल्याकारणाने या शाखेत वाय-फाय अथवा तत्सम सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे. कारण पैशांशिवाय बाजारात कुठलाही व्यवहार होत नाही, पैसा मिळाला नाही म्हणून जनतेत संताप होतो, वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
नेट बँकिंगचा सरकारकडून आग्रह धरला जातो. परंतु इंटरनेट सुविधा चांगल्या पुरवल्या तरच हा आग्रह कामाचा, अशी उपरोधिक टीकादेखील जनतेतून होत आहे.
उत्राण गावाकडे भारत दूरसंचार निगमची केबल तुटली आहे. त्यामुळे नेट बंद आहे. नेट बंद असल्याने व्यवहार बंद आहेत.
-दिलीप कुलकर्णी, शाखाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कासोदा, ता.एरंडोल