नवीन 9 तलाठी सजांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:02 PM2017-08-28T14:02:37+5:302017-08-28T14:03:27+5:30
भडगाव तालुका : कामाचा ताण कमी करण्यासाठी शासनाचा निर्णय
भडगाव : वाढती लोकसंख्या, अपूर्ण तलाठी सजे यामुळे महसूल विभागाचा कामाचा व्याप वाढत आहे. यासाठी वाढीव तलाठी सजेची संख्यावाढीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार तालुक्यात नवीन 9 तलाठी सजेची निर्मिती झाली आहे. तसेच आदेश तहसीलला मिळाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.
पूर्वी 26 तलाठी सजे होते. त्यामुळे एका तलाठी सजेवर अनेक गावांचा भार असल्याने तलाठय़ांवरील कामाचा ताण अधिक होता. नागरिकांचीही गैरसोय होत होती. तलाठी कार्यालयही काही वेळेस बंद राहात असे. आता नवीन तलाठी सजे झाल्यावर तलाठय़ांचाही ताण कमी होणार आहे.
गावाची लोकसंख्या वाढली मात्र 26 तलाठी सजे जैसे थे होते. सर्व परिस्थिती पाहता तत्कालिन प्रांत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली. यात तहसीलदार सी.एम.वाघ, निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांचाही समावेश होता. ऑगस्ट 2017 मध्ये नवीन तलाठी सजे वाढविण्याबाबत जिल्हाधिका:यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. यानुसार नवीन 9 तलाठी सजे प्रस्तावित केले आहेत.
भडगावला पूर्वी एक तलाठी होता आता नवीन दोन तलाठी सजे वाढल्याने 36 हजार लोकसंख्येला तीन तलाठी सजे राहणार आहेत. गुढय़ाला एक तलाठी होता आता गावाचे दोन भाग करुन नवीन एक तलाठी सजा वाढणार आहे. कजगावला एक तलाठी कार्यरत होता, आता नव्याने गावाचे दोन भाग मिळून एक नवीन तलाठी वाढून दोन तलाठी सजा होणार आहे. मात्र कजगाव 2 भागाला पासर्डी गाव जोडण्यात आले आहे,
नवीन तांदूळवाडी तलाठी सजा असून या सजेला मळगाव जोडले आहे. नवीन लोण प्र.भ सजा असून यात नावरे, घुसर्डी, दलवाडे ही गावे जोडली आहेत. नवीन बांबरुड प्र.ऊ. ला सजा झाली असून यात मांडकी, भट्टगाव ही गावे जोडली आहेत. नवीन कोठली तलाठी सजा असून यात वडधे जोडले आहे.
तालुक्यात नवीन 9 तलाठी सजे वाढल्याने महसूल विभागाच्या कामास गती मिळणार आहे. नागरिकांचीही मोठी सोय होणार आहे. मागील 24 तलाठी सजे व नवीन 9 तलाठी सजे असे मिळून एकूण 33 सजे तालुक्यात होणार आहे.
याबाबत शासन आदेशाच्या याद्या तहसील कार्यालयास मिळाल्या असून या याद्या भडगाव पंचायत समिती, तलाठी सजा, ग्रा.पं. कार्यालयारत प्रसिध्दीसाठी लावल्या आहेत. 31 र्पयत नागरिकांच्या हरकती घेण्याची मुदत असल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
आता 6 तलाठी सजांसाठी एक महसूल मंडळ या तत्वानुसार पुन्हा वाढीव तलाठी सजेसाठी नव्याने नवीन दोन महसूल मंडळे स्थापन केली जाणार आहेत. तसा प्रस्तावही जिल्हाधिका:यांकडे पाठविला जाणार आहे. सध्या चार महसूल मंडळे असून तालुक्यात नवीन दोन महसूल मंडळे वाढून 6 महसूल मंडळे प्रस्तावित होऊ शकतात, अशी माहिती महसूल विभागाने दिली.
नवीन 9 तलाठी सजामध्ये पुढीलप्रमाणे गावांचा समावेश केला आहे. भडगाव 2, टोणगाव 2, गुढे 2, पिचर्डे, कजगाव, तांदूळवाडी, लोण प्र.भ., बांबरुड प्र.ऊ. , कोठली .