नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाठ्यपुस्तकांविनाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:16+5:302021-06-17T04:12:16+5:30

.......................... लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगावः मंगळवारी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून ती नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांशिवाय झाली आहे. ऑनलाईन ...

New academic year begins without textbooks! | नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाठ्यपुस्तकांविनाच !

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाठ्यपुस्तकांविनाच !

Next

..........................

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगावः मंगळवारी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून ती नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांशिवाय झाली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरुच ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे. मात्र ग्रामीण व काहीअंशी शहरी भागातही ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यापूर्वीच उघड झाल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवणारा एकमेव घटक म्हणजे पाठ्यपुस्तके. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातच पाठ्यपुस्तकांविना झाली आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख विद्यार्थ्यांना नव्याकोऱ्या पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असतांना देखील राज्यभर सर्वदूर नवी पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पोहचली होती. राज्यातील शासकीय व अनुदानित इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालभारतीतर्फे मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. यावर्षी मात्र शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाठ्यपुस्तकांशिवाय झाली असून शाळांना जुनी पाठ्यपुस्तके जमा करुन विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. शाळाच बंद असल्याने पाठ्यपुस्तके गोळा कशी करायची ? असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांना पुढचे दोन ते तीन महिने पाठ्यपुस्तकांची वाट पाहावी लागणार असल्याची स्थिती आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे निर्देश असले तरी, ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोनची उपलब्धता नगण्य आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही अडसर आहेच. त्यामुळे अशा स्थितीत पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

.............

चौकट

पाठ्यपुस्तकांसाठी प्रतीक्षा

पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचा वाद न्यायालयात पोहचल्याने यावर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी पाठ्यपुस्तकांची छपाई होऊ शकली नाही. मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर पाठ्यपुस्तकांच्या छपाईचा मार्ग मोकळा झाला असला तरी यासाठी बालभारतीला नव्याने निविदा काढावी लागणार आहे. यामुळे पुढचे दोन ते तीन महिने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी वाट पाहावी लागणार आहे.

.............

चौकट

जुनी पुस्तके गोळा कशी करायची ?

कोरोनामुळे लॉक झालेल्या शाळा १५ महिन्यांनंतरही बंदच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे असणारी जुनी पाठ्यपुस्तके गोळा कशी करायची ? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. अलीकडील पुस्तकांची बांधणीही व्यवस्थित नसल्याने वर्षभरातच त्यांची पाने मोकळी होतात.

१...नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षणात आदल्या वर्षीची उजळणी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

२..यासाठी पाठ्यपुस्तक हे महत्त्वाचे अभ्यास साहित्य आहे. तेच जर विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसेल तर अभ्यास कसा घेणार, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

३...विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवणारे एकमेव साधन म्हणजे पाठ्यपुस्तक. इयत्ता बदलल्याने ते त्यांच्याकडून काढून घेणे योग्य नाही. अशाही प्रतिक्रिया शिक्षकांनी '' लोकमत '' शी बोलतांना नोंदवल्या आहे.

...................

चौकट

जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीचे साडेपाच लाख विद्यार्थी

जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवी इयत्तेत दाखल असणाऱ्या साडेपाच लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा आहे. यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील उशिराच पुस्तके मिळतील. गेल्यावर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांची संख्या ७६ हजार ५१४ इतकी होती.

इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या अशीः

दुसरी - ७६, ५१४

तिसरी - ७९, ३१३

चौथी - ७७, ९८४

पाचवी - ८०, ०५०

सहावी - ७८, ८२८

सातवी - ७७, ३११

आठवी - ७७, ६७७

...........

इन्फो

जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी मागणी नोंदवली आहे. शाळांना जुनी पुस्तके जमा करुन विद्यार्थ्यांना वाटप करण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहे. पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्यानंतर त्यांचे तालुकानिहाय वितरण केले जाईल.

- बी.जे. पाटील

जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्य. विभाग, जळगाव.

.............

पॉईंटर

- पाठ्यपुस्तकांविनाच यावर्षी शाळांच्या ऑनलाईन घंटा

- गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळाली होती पाठ्यपुस्तके

- छपाईसाठी वापरावयाच्या कागदाचा वाद न्यायालयात पोहचल्याने लागला ब्रेक

- पुढचे दोन ते तीन महिने पाठ्यपुस्तकांसाठी करावी लागणार प्रतीक्षा

- जुनी पुस्तके संकलित करण्यात अडचणी.

- जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीचे साडेपाच लाख विद्यार्थी

- विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवण्यासाठी पाठ्यपुस्तक महत्त्वाचा घटक

- नव्या शैक्षणिक वर्षातही उजळणी घेण्यासाठी पाठ्यपुस्तके हवेच

- रिकाम्या वर्गांमध्ये पाठ्यपुस्तकांशिवाय सुरु झाले यंदाचे शैक्षणिक वर्ष

Web Title: New academic year begins without textbooks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.